

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी संघटना 'अलकायदा' ने बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे.
धमकीनंतर दिल्ली विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना शनिवारी संध्याकाळी अलकायदाच्या नावाने एक ई-मेला आला होता.
येत्या काही दिवसात आयजीआय विमानतळाला बॉम्बस्फोटने उडवून देण्याची धमकी यातून देण्यात आली आहे. स्वांतत्र्यदिनाच्या अनुषंगाने राजधानीच्या सुरक्षा व्यवस्थेत अगोदरपासून वाढ करण्यात आली आहे. पंरतु, अलकायद्याच्या या धमकीनंतर आता सर्व सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
करणबीर सुरी उर्फ मोहम्मद जलाल आणि त्याची पत्नी शैली शारा उर्फ हसीना रविवारी सिंगापूरवरून भारतात येत आहेत. येत्या एक ते दोन दिवसात ते विमानतळावर बॉम्बस्फोट घडवतील, अशी धमकी अलकायदा ने दिली आहे.
पंरतु, यापूर्वी देखील याच नावाने आणि असेच विवरण असलेल्या पती-पत्नींच्या नावाने धमकी संदेश मिळाला होता, अशी माहिती डीआयडीकडून देण्यात आली आहे.
पूर्वीच्या धमकीत करणबीर तसेच शैली आयएसआयएसचे म्होरके असल्याचे सांगण्यात आले होते. १८ एप्रिलला दिल्ली विमानतळावरील एका विमानात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.
बंगळूरवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानात एक प्रवाशाला स्वच्छतागृहात यासंबंधीचे पत्र मिळाले होते. यात विमानात बॉम्ब असल्याचे आणि त्याला दिल्ली विमानतळावर पोहचताच उडवण्याचा उल्लेख करण्यात आला होता.
विमानतळावर पोहचताच बॉम्ब विरोधी पथकाने संपूर्ण विमानाची तपासणी केली. पंरतु, कुठेही विस्फोटके आढळली नव्हती.
हे ही वाचलं का?