वैद्यकीय महाविद्यालय : वैद्यकीय शिक्षणतील खेळ महाराष्ट्राला परवडतील? | पुढारी

वैद्यकीय महाविद्यालय : वैद्यकीय शिक्षणतील खेळ महाराष्ट्राला परवडतील?

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी मिळविण्यासाठी जुन्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील शिक्षकवर्ग स्थलांतरित करण्याचा राज्य शासनाचा खेळ अंगाशी येण्याची शक्यता आहे. शासनाने सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शिक्षक वर्ग तेथील अस्थापनेवर दाखविला होता.

प्रत्यक्षात भारतीय आयुर्विज्ञान आयोगाच्या तपासणीचे पथक दाखल झाल्यानंतर तेथे पथकासमोर अधिष्ठाता व शिक्षकांच्या उशिरा उपस्थितीचा गोंधळ सध्या वैद्यकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे सिंधुदुर्गची चालू शैक्षणिक वर्षापासूनची मान्यता अडचणीत असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहेच. शिवाय यामुळे ज्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षकांचे स्थलांतर झाले, तेथील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मान्यतांवरही मंजुरीची टांगती तलवार आहे.

राज्य शासनाने गतवर्षी राज्यात सिंधुदुर्ग, सातारा व अलिबाग येथील तीन नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली होती. या महाविद्यालयांना भारतीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मान्यतेसाठी तपासणीची आवश्यकता होती. त्यासाठी आयोगाच्या आकृतिबंधाप्रमाणे शिक्षक वर्ग व पायाभूत सुविधांची परिपूर्णता नसल्याने राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने पंरपरेनुसार जुन्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थापनेवरील शिक्षकवर्ग नव्या महाविद्यालयांच्या मंजुरीसाठी तेथील अस्थापनेवर स्थलांतरित केला.

अशी कृती ही वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीत अडचण निर्माण करू शकणारी आहे. नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी शासन स्तरावरून कशा कसरती केल्या जातात, याचे नमुनेदार उदाहरण म्हणून सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणीची चर्चा सुरू आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थापनेवर वैद्यकीय शिक्षण विभागाने अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधून कर्मचारीवर्ग स्थलांतरित केला. यामध्ये कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 34 शिक्षकांचा समावेश होता. शिवाय कोल्हापूरच्या महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना सिंधुदुर्गच्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणूनही दाखवण्यात आले.

आयोगाच्या नियमाप्रमाणे एका शैक्षणिक वर्षात एक शिक्षक दोन वैद्यकीय महाविद्यालयांच्या अस्थापनेवर दाखवता येत नाहीत. असे असूनही हा खेळ खेळला गेला. प्रत्यक्षात जेव्हा आयोगाचे तपासणी पथक सिंधुदुर्गात दाखल झाले, तेव्हा त्यांच्या निदर्शनास आलेल्या गोष्टींवरून हा खेळ अंगाशी येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

आयुर्विज्ञान आयोगाची तपासणी हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवासात सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. ही तपासणी आकस्मिक स्वरूपाची असल्याने सर्व पायाभूत सुविधांसह शिक्षक सज्ज ठेवावे लागतात. प्रत्यक्षात सिंधुदुर्गात गतसप्ताहात झालेल्या या तपासणीवेळी आयोगाचे पथक सकाळी लवकर महाविद्यालयात दाखल झाले, तेव्हा अधिष्ठातांचाही पत्ता नव्हता आणि शिक्षकही उपस्थित नव्हते, असे समजते.

कोल्हापुरातून निघालेले अधिष्ठाता दुपारी एक वाजता पोहोचले, तर स्थलांतरित शिक्षकांची गाडी सिंधुदुर्गच्या धक्क्याला लागण्यासाठी दुपारी उलटून गेली होती. यामुळे तपासणी काय करायची, असा प्रश्‍न या पथकापुढे होता.

Back to top button