ऑलिम्पिक भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ : सुवर्णयुगाची नांदी!

ऑलिम्पिक भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ : सुवर्णयुगाची नांदी!
Published on
Updated on

भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाची ऑलिम्पिक मधील कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय संघ ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदकापर्यंत पोहोचू शकतो हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमध्येही निर्माण झाला आहे.

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात जागतिक हॉकी क्षेत्रात भारताने सुवर्णयुग निर्माण केले होते. स्वातंत्र्यानंतरही 1956 पर्यंत भारताचा जागतिक स्तरावर दबदबा होता. भारतीय संघाविरुद्ध खेळताना प्रतिस्पर्धी देशांना धडकी भरत असे. मात्र, गेल्या चाळीस वर्षांत भारतीय संघाला कोणी घाबरेनासे झाले.

भारतीय हॉकी क्षेत्र म्हणजे जागतिक स्तरावरील टवाळकीचा विषय झाला होता. तथापि भारताने यंदाच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत घेतलेली झेप लक्षात घेतली तर भारतीय संघ पुन्हा हॉकीमध्ये सुवर्णयुग निर्माण करेल, असेच चित्र दिसून येऊ लागले आहे.

भारतीय पुरुष संघाने गेल्या चार वर्षांत ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या संघांविरुद्ध सनसनाटी विजय मिळविले होते. तसेच जागतिक हॉकी लीग, आशिया चषक स्पर्धा, चॅम्पियन चषक, अझलन शाह चषक स्पर्धा आदी स्पर्धांमध्ये या संघाची कामगिरी लक्षणीय झाली होती.

त्यामुळे भारतीय संघाला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये बाद फेरीत स्थान मिळेल याचीच सर्वांना खात्री होती. या आत्मविश्वासाला जबरदस्त कामगिरीची जोड देत त्यांनी ब्राँझपदकावर आपली मोहर नोंदवली. मॉस्को येथे 1980 मध्ये झालेल्या सुवर्णपदकानंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपविण्यात भारतीय संघाने यश मिळवले.

अपार कष्टाचे फलित

भारतीय महिला संघाने 2016 मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत सोनेरी कामगिरी करत ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला होता. त्या पाठोपाठ त्यांनी 2017 मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही सुवर्णपदक पटकाविले.

तरीही जागतिक स्तरावर अन्य देशांच्या हॉकी संघाचा असलेला वरचष्मा लक्षात घेता भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवेल, अशी कोणी अपेक्षाही केली नव्हती. मात्र, उत्कृष्ट सांघिक कौशल्याला राणी रामपालचे कुशल नेतृत्व आणि शोर्ड मरिन यांचे मार्गदर्शन याच्या जोरावर भारतीय महिला संघाने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली आहे.

भारताच्या पुरुष आणि महिला संघांची ही कामगिरी म्हणजेच गेल्या सहा-सात वर्षांमध्ये राष्ट्रीय स्तरावर हॉकीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घेण्यात आलेले अपार कष्ट, संघर्षपूर्ण करिअर करताना खेळाडूंनी दाखवलेली खेळावरची निष्ठा आणि अफाट मेहनत याचेच प्रतीक आहे.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी जागतिक स्तरावर भारतीय हॉकी संघाला कीर्तीच्या शिखरावर नेले होते. त्यांनी एकट्याने ऑलिम्पिकमध्ये 51 गोल केले होते. दोन महायुद्धांच्या काळात ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत, अन्यथा त्यांनी ऑलिम्पिक कारकिर्दीत गोलांचे शतक नोंदविले असते. त्यांच्या स्टिकमध्ये चेंडू आला की प्रतिस्पर्धी संघावर गोल होणारच अशीच त्यांची हुकूमत होती. त्यांच्यासह अनेक श्रेष्ठ खेळाडू भारताला मिळाले होते, त्यामुळेच हॉकीत भारताची निर्विवाद सत्ता होती.

भारताने सन 1972 मध्ये पुरुषांच्या हॉकीत ब्राँझपदक पटकावले आणि तेथूनच भारतीय हॉकीची घसरगुंडी सुरू झाली. अपवाद फक्त 1980 च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा. या स्पर्धेवर अनेक मातब्बर संघांनी बहिष्कार घातला होता. त्याचा फायदा घेत भारताने ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर भारताची ऑलिम्पिकमधील पदकांची पाटी कोरीच राहिली होती.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता पूर्ण न होण्याची नामुष्कीही भारतावर ओढविली होती. त्यातच भारताच्या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी महासंघांमधील मतभेद, एकाच राज्यांमध्ये समांतर स्तरावर कार्यरत असलेल्या 2-3 संघटना, खेळाडूंमधील उदासीनता यामुळे आपल्या देशातील हॉकी नामशेष होणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती.

त्यातच क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अन्य खेळांकडे प्रायोजकांनी फिरवलेली पाठ याचा परिणाम हॉकी क्षेत्रावर खूपच झाला. पुरुष हॉकीप्रमाणेच भारताच्या महिला हॉकी क्षेत्रालाही मोठा फटका बसला. स्थानिक स्तरावर प्रशिक्षक मिळेनासे झाले आणि सहभागी खेळाडूंची संख्याही रोडावली.

भारतीय हॉकीत महत्त्वपूर्ण बदल

भारताला जागतिक स्तरावर पुन्हा नावलौकिक मिळवून द्यायचा असेल तर राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर भक्कम संघटना उभारण्याची आवश्यकता आहे हे संघटकांच्याही लक्षात आले. नरेंद्र बात्रा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हॉकी इंडियाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणले.

सबज्युनिअर आणि ज्युनिअर स्तरावरील खेळाडू नैपुण्य चाचणी आणि विकास, हॉकीसाठी पोषक वातावरण असलेल्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणे, परदेशी खेळाडूंबरोबर स्पर्धात्मक अनुभव मिळावा यासाठी आपल्या देशात विविध आंतरराष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धांचे आयोजन करणे, कनिष्ठ आणि वरिष्ठ भारतीय संघांना परदेशात आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये तसेच प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेण्याची संधी देणे, वेगवेगळ्या ठिकाणी अकादमी सुरू करून तेथे अनुभवी प्रशिक्षक नियुक्त करणे या प्रशिक्षकांसाठी वेळोवेळी उद्बोधक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे आदी अनेक योजना राबविल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंधरा मिनिटांचा चार डावांचा सामना आयोजित करण्यास सुरुवात झाल्यानंतर खेळाडूंनाही अधिक

गतिमान कौशल्य दाखवण्याची

आवश्यकता आहे हे लक्षात आल्यानंतर हॉकी इंडियाने फाईव्ह-अ-साईड स्पर्धांचे आयोजन सुरू केले आणि त्याचा फायदा खेळाडूंचे कौशल्य वाढवण्यासाठी निश्चितच झाला. भारतात अजूनही अनेक ठिकाणी मातीवरच स्पर्धा आणि सराव सुरू असतो.

शक्यतो राज्य आणि अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन कृत्रिम मैदानावरच करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुदैवाने हॉकी इंडियाच्या आणि अन्य काही राज्य संघटनांच्या हाकेला वेळोवेळी दाद देत संबंधित शासनानेही भरपूर आर्थिक सहकार्य केले आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत सर्वच देशांच्या हॉकी संघांना स्पर्धा आणि सर्वांपासून दूर राहण्याचा खूप फटका बसला होता. भारतीय खेळाडूही त्यास अपवाद नाहीत. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला परदेश दौर्‍यावर जाण्याची परवानगी मिळाली आणि त्याचा फायदा दोन्ही संघांना निश्चितच झाला.

ग्रॅहम रीड यांचे मार्गदर्शन, मनप्रीत सिंग याचे कुशल नेतृत्व, गोलरक्षणासाठी असलेली पोलादी भिंत म्हणजेच पी.आर. श्रीजेश यांच्याबरोबरच संघातील अन्य सर्व सहकारी तसेच स्टाफ यांचा भारताच्या ब्राँझपदकात मोठा वाटा आहे.

भारतीय संघात असलेले रूपिंदर पाल सिंग आणि वरुणकुमार या ड्रॅग फ्लिकरबरोबरच गुर्जंटसिंग, हरमानप्रीत सिंग, हार्दिक सिंग, सिमरनजीत सिंग यांनीही वेळोवेळी गोल करीत भारताच्या विजयास हातभार लावला.

ब्राँझपदकाच्या लढतीत दोन वेळा पिछाडीवर असूनही जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमविणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. संघाचा तिरंगा फडकविण्याच्याच उद्देशाने खेळताना भारतीय खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, आत्मविश्वास आणि झुंजार वृत्ती खरोखरीच अतुलनीय आहे. हे ऑलिम्पिक पदक म्हणजे एकशे तीस कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताच्या हॉकी क्षेत्रासाठी सन्मानच आहे.

मरिन यांचे कुशल मार्गदर्शन

भारतीय महिला संघ गेले तीन वर्षे मरिन यांच्या मार्गदर्शनाखालीच सराव करीत आहे. साहजिकच भारतीय खेळाडूंच्या गुणदोषांचा अतिशय बारकाईने अभ्यास करीत मरिन यांनी वेगवेगळे डावपेच आखले होते.

खरे तर ऑलिम्पिकपूर्व म्हणावे तसे सराव शिबिर आयोजित करणे शक्य झाले नव्हते. तरीही त्यांनी भारतीय खेळाडूंमध्ये ऑलिम्पिकसाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास निर्माण केला. प्रत्येक सामन्यानंतर आपणच आपल्या कौशल्याबाबत आत्मपरीक्षण करीत त्याप्रमाणे आपल्या खेळात सुधारणा करण्याची जबाबदारी त्यांनी प्रत्येक खेळाडूवरच सोपवली होती.

उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियासारख्या श्रेष्ठ संघावर विजय मिळवणे म्हणजे एक कठीणच परीक्षा होती. सामन्याच्या सुरुवातीलाच आघाडी घेतली की आपोआपच मनोधैर्य उंचावले जाते आणि ही आघाडी कायम ठेवणे सोपे जाते हीच रणनीती भारतीय संघाने अमलात आणली होती.

भारतीय महिला संघातील अनेक खेळाडूंनी अनेक स्तरावर संघर्ष करीत हॉकीत करिअर केले आहे. भारतीय महिलाचे क्षेत्र म्हणजे चूल व मूल एवढेच राहिले नसून त्यादेखील हॉकीत मर्दुमकी गाजवू शकतात हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत राणी रामपाल आणि तिच्या सहकार्‍यांनी हॉकीमध्ये आश्वासक करिअर केले आहे.

आघाडी फळीमध्ये गुरजित कौर, नेहा गोयल, ऐतिहासिक हॅट्ट्रिक नोंदविणारी वंदना कटारिया, शर्मिला देवी यांनी आघाडी फळीत आपल्यावर सोपविण्यात आलेली कामगिरी चोख बजावली. भारताची गोलरक्षक सविता कुमारी हिने या स्पर्धेत किमान दोन डझन तरी गोल रोखले असतील. तिला बचावफळीतील सुशीला चानू, दीप ग्रेस एक्का यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

भारताच्या दोन्ही संघांची कामगिरी देशाच्या हॉकी क्षेत्रास फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय संघ ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदकापर्यंत पोहोचू शकतो हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमध्येही निर्माण झाला आहे.

आपल्या देशात अधिकाधिक जागतिक स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळत आहे आणि त्याचा फायदा ग्रामीण आणि युवा वर्गातील खेळाडूंना या खेळात आर्थिक स्थैर्य देणारे करिअर घडविण्यासाठी होणार आहे.

आपल्या मुलांना हॉकीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे भावी काळात हॉकीचे सुवर्णयुग निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे व्यासपीठ निर्माण झाले आहे.

इसवी सन 2022 मध्ये होणारी

आशियाई क्रीडा स्पर्धा आणि त्यापाठोपाठ 2024 मध्ये होणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आदी स्पर्धांसाठी भारतीय संघाने भावी सुवर्णयुगाची पायाभरणी केली आहे. या स्पर्धांमध्ये भारतीय संघ दोन्ही गटांत सुवर्ण पदकांचे स्वप्न साकार करू शकेल अशी अपेक्षा आहे.

मिलिंद ढमढेरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news