श्रावण विशेष : व्रत वैकल्‍याचा श्रावण महिना…

श्रावणसणांचे उपकार
श्रावणसणांचे उपकार
Published on
Updated on

श्रावण विशेष : श्रावण महिन्यास धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. हा महिना व्रतवैकल्यांचा महिना म्हणूनच ओळखला जातो. चैत्र ते फाल्गुन जे 12 महिने आहेत. त्यास चांद्रमास असे म्हणतात. श्रावण महिन्यास श्रावणच का म्हणतात, असा प्रश्न पडणे साहाजिक आहे. ज्या चांद्रमासाच्या पौर्णिमेच्या जवळपास श्रवण नक्षत्र असते त्या चांद्र महिन्यास श्रावण ही संज्ञा आहे. किंबहुना श्रवण वरून श्रावण असे नाव आलेले आहे.

श्रावण विशेष : श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या जवळपास श्रवण नक्षत्रात चंद्र असतो म्हणून त्यास श्रावण असे संबोधले जाते. या महिन्यात जी जी पुण्यदायक कृत्ये जसे की देवादिकांस अभिषेक, दानधर्म, व्रताचरण इ. करावे तितके ते पुण्यदायक सांगितलेले आहे.

श्रावण महिन्यात प्रत्येक तिथीस विशिष्ट देवतेस कापसाचे वस्त्र (पवित्रक) अर्पण करावयास सांगितलेले आहे. तत्वसार संहितेतील वचनानुसार श्रावण मासातील प्रत्येक तिथीस त्या-त्या देवतांना कापसाची वस्त्रे (पवित्रारोपण) अर्पण करतात, त्या देवता तिथीनुसार-प्रतिपदा-कुबेर, द्वितीया-लक्ष्मी, तृतीया-पार्वती, चतुर्थी-गणपती व त्रिपुरभैरवी, पंचमी-चंद्र, षष्ठी-कार्तिकेय, सप्तमी-सूर्यनारायण, अष्टमी-दुर्गा व सर्व देवता, नवमी-देवी व सर्व देवता, दशमी-धर्मराज (यम), एकादशी-ऋषी, द्वादशी-विष्णू, त्रयोदशी-कामदेव, चतुर्दशी-शंकर, पौर्णिमा-पितर.

श्रावण महिन्यात विष्णू व शंकरास महिनाभर अभिषेक करावे असे शास्त्र सांगते. विशेषकरून श्रावण महिन्यात शंकरास रुद्राभिषेक जरूर करावा. रुद्राभिषेक करताना कामनापरत्वे अभिषेकास कोणते द्रव्य वापरावे हे देखील शास्त्रात सांगितलेले आहे. जसे की, पाऊस पडण्यासाठी पाण्याचा अभिषेक, रोगशांती व आरोग्य प्राप्तीसाठी दर्भमिश्रित पाण्याचा अभिषेक पशूधन प्राप्त होण्यासाठी दह्याचा अभिषेक, संपत्ती प्राप्तीसाठी उसाच्या रसाचा अभिषेक, धनवान होण्यासाठी मधमिश्रित तुपाचा अभिषेक, मुमूक्षत्व प्राप्त होण्यासाठी तीर्थाच्या जलाचा अभिषेक, पुत्रप्राप्तीसाठी दूधाचा अभिषेक, ज्वरशांतीसाठी पाण्याचा अभिषेक, वंशवृद्धीसाठी तुपाचा अभिषेक, प्रमेह रोग शांत होण्यासाठी दूधाचा, बुद्धीचे जडत्व जाण्यासाठी साखरमिश्रित दूधाचा, शत्रूबुद्धीचा नाश होण्यासाठी मोहरीच्या तेलाचा, क्षयरोग जाण्यासाठी मधाचा अभिषेक, पापक्षय व्हावा म्हणून मधाचा अभिषेक, सर्वरोग नाश होण्यासाठी गायीच्या तुपाचा अभिषेक ह्या प्रमाणे सांगितलेले आहेत.

श्रावण महिन्यातच शंकराच्या उपासने बरोबरच सोमवार व्रताचे देखील अनन्यसाधारण महत्व स्कंदपुराणात सांगितलेले आहे. सोमवारव्रतं कार्यम् श्रावणे वै यथाविधी। शक्तेन उपोषणं कार्यं अथवा निशिभोजनं॥ सोमवारे विशेषेण प्रदोषादिगुणैर्युते। केवलं वाऽपि ये कुर्यु: सोमवारे शिवार्चनम्॥ न तेषां विद्यते किंचिदिहामुत्र च दुर्लभं। उपोषित: शुचिर्भूत्वा विधिवत् पूजयेच्छिवम्॥ ब्रह्मचारी गृहस्थोवा कन्या वापि सभर्तृका। विभर्तृका वा संपूज्य लभते वरमीप्सितम्॥

श्रावणी सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा व दुसरे दिवशी सोडावा, ते शक्य न झाल्यास प्रदोष व्रताप्रमाणे दिवसभर उपवास करुन सायंकाळी शिवपूजन करुन सूर्यास्तानंतर दोन तासांनी सोडावा. श्रावणी सोमवारचे व्रत विधीवत केल्यास इच्छित मनोकामना पूर्ण होतात.
श्रावणी सोमवारी नवविवाहित स्त्रियांनी विवाहानंतर पाच वर्षे पर्यंत शिवामुष्टी व्रत हे व्रत करावे असे शास्त्र सांगते.

शिवमंदिरात जाऊन पुढील संकल्प करावा-मम अवैधव्यपुत्रपौत्रादि ऐहिक सकल भोगैश्वर्यप्राप्तिपूर्वक शिवलोकप्राप्तिद्वारा श्रीशिवप्रीत्यर्थं (अमुक) धान्यसमर्पणं अहं करिष्ये॥ (धान्यांची संस्कृत नावे अमुक शब्दाच्या ठीकाणी योजावीत- तांदूळ(तण्डुल), तीळ(तिल), गहू(गोधूम), मूग(मुद्ग), सातू(यव)) व पूढील मंत्र म्हणून शंकरास शिवामुठ वहावी- 'नम: शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने।नंदिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे॥'

श्रावण शुक्ल पंचमीस नागपंचमी व्रत असते. मनुष्याबरोबरच प्राण्यांचा पण विचार करावयास शिकवणारी आपली संस्कृती आहे. पोळा, वसुबारस, नागपंचमी यांसारखी व्रते त्याची साक्ष देतात.

नागपंचमीस घराच्या दारावर गायीच्या शेणाने नागाचे चित्र काढावे, व त्याची गंध, फुले, दुर्वा इत्यादी वाहून यथाविधी पूजा करावी. नागास दूध,दही व तूप यांचा नैवेद्य दाखवावा व पुढील मंत्राने नागाची प्रार्थना करावी. ज्यांना धातुच्या अगर मातीच्या नागाची प्रतिमा (मूर्ती) करावयाची असेल त्यांनी मत्स्यपुराणात सांगितल्यानुसार नागाची मूर्ती तयार करवून घ्यावी.

मत्स्यपुराणानुसार नागप्रतिमेची (मूर्तीची) लक्षणे खालील प्रमाणे. नागाश्चैव तु कर्तव्या: खड्गखेटकधारिण:। अध:सर्पाकृतिस्तेषां नाभेरुर्ध्वं तु मानुषी। फणाश्च मूर्ध्नि कर्तव्या द्विजिव्हा बहवोऽसमा:। नागाची मूर्ती करताना मूर्तीच्या कमरेखालील भाग सर्पाकृती व कमरेच्या वरील भाग मनुष्याकृती असावा, मूर्तीला दोन अथवा विषम संख्येत जिभा असाव्यात, हातात ढाल तलवार असून डोक्यावर फणा असावा. नागपंचमीचे दिवशी नागपूजन झाल्यावर खालील नवनाग स्तोत्राचा यथाशक्ती पाठ करावा. अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं। शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा। एतानि नवनामानि नागानां च महात्मन: सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:। तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्।

श्रावण पौर्णिमेस रक्षाबंधन हा दिवस असतो. भाऊ व बहिण यांच्यतील पवित्र बंधनाचा हा दिवस. या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधताना पुढील श्लोक म्हणावा. 'येन बद्धो बलीराजा दानवेंद्रो महाबल:। तेनत्वामभिबध्नामि रक्षे माचलमाचल॥'

यावर्षी 15 ऑगस्ट रोजी रविवारी सप्तमी तिथी आलेली आहे. यास भानुसप्तमी असे म्हणतात. भानुसप्तमी ही तिथी सूर्यग्रहणासमान पुण्यदायक सांगितलेली आहे. या दिवशी स्नान, दान, जप, श्राद्ध इ. केल्यास त्याचे फळ अक्षय होते.

श्रावण कृष्ण अष्टमीस मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा अवतार झालेला आहे. या तिथीस जन्माष्टमी असे म्हणतात. जन्माष्टमीस उपवासाचे विशेष महत्व आहे. उपवासपूर्वक या दिवशी श्रीकृष्णांचे विशेष पूजन करावे.

श्रावण अमावस्येस पिठोरी अमावास्या हे व्रत अनेक स्त्रिया करतात. ज्या दिवशी प्रदोषकाळी अमावस्या असेल त्या दिवशी हे व्रत करतात. स्त्रियांनी या दिवशी नक्तव्रत (दिवसभर उपवास करून सायंकाळी उपवास सोडणे) करावे. सायंकाळी स्नान करून प्रदोषकाळी, सौभाग्य व पुत्रपौत्र वृद्धी व्हावी अशा विधिवत संकल्पपूर्वक 64 योगिनींचे षोडशोपचार पूजन करावे. त्यानंतर मग उपवास सोडावा.

अशाप्रकारे श्रावण महिन्यात अनेकप्रकारची व्रते, उपासना इत्यादी सांगितलेल्या आहेत. शास्त्रशुद्ध मार्गाने याचे आचरण करून आपण इष्ट फल प्राप्त करून घेऊ शकतो.

  • देशपांडे पंचांगकर्ते पं गौरव देशपांडे, पुणे

(लेखक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news