त्या दोन्ही घटनांमुळे शहरवासीय सुन्न: पालकांची वाढली चिंता

त्या दोन्ही घटनांमुळे शहरवासीय सुन्न: पालकांची वाढली चिंता
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

मोबाईल बाजूला ठेऊन अभ्यासाकडे लक्ष दे, असे म्हंटल्याने एका सोळावर्षीय मुलाने आत्महत्या केली. तर, मोबाईलवर हॉरर फिल्म पाहून एका आठ वर्षीय मुलाने खेळण्यातील बाहुलीला फाशी देऊन स्वतः गळफास लावून घेतला. या दोन्ही घटनांमुळे शहरवासीय सुन्न झाले असून पालकांची चिंता वाढली आहे. तसेच, मोबाईलचा अतिवापर हा मुलांसाठी धोकादायक असल्याचे अधोरेखित झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडिलांनी मुलाला "मोबाईलचा वापर कमी कर, अभ्यासाकडे जरा लक्ष दे", असे सांगितल्याने बद्रीनाथ विष्णू राठोड (16, रा. आळंदी देवाची, मूळ रा. जिंतूर, परभणी) या नववीच्या वर्गात शिकणार्‍या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. दरम्यान, थेरगाव येथे देखील कमल खेम साऊद (वय 8, रा. सोळा नंबर बस स्टॉप, थेरगाव) या मुलाने गळफास घेतल्याचे उघड झाले.

कमल याने मोबाईलवर हॉरर फिल्म पाहून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले. कमलने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या बाहुलीला फाशी दिली. एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर देखील कपडा बांधला होता.या घटनांमुळे मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांच्या पालकांची चिंता वाढली आहे.

दररोजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांवर आई वडील वगळता आजी, आजोबा, काका, काकू यांचा धाक राहत नाही. त्यामुळे मुले दिवसभर मोबाईलवर गेम व व्हिडीओ पाहत राहतात. त्यामुळेच मुलांना मोबाईलचे व्यसन लागू आत्महत्या सारख्या घटना घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शारीरिक खेळाकडे दुर्लक्ष

यापूर्वी मुलांनी शारीरिक मैदानी खेळ आत्मसात करावेत, यासाठी पालक आग्रही होते. पुस्तक वाचन, लेखन करीत असलेल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र, अलीकडे मुले कुटुंब, मित्र परिवार, नातेवाईक, परिसरातील नागरिक यांच्यात न मिसळला मोबाईलला पसंती देतात. त्यामुळे मोबाईलचे व्यसन लागून मुलांमध्ये हट्टीपणा वाढत जातो. त्यामुळे पालकांनी वेळीच मुलांना सावरून त्यांच्यात मैदानी खेळाची गोडी निर्माण करण्याची गरज आहे.

आईवडिलांनी मुलांसाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. पालकांचे लक्ष नसल्याने मुलांमध्ये नकारात्मक भाव वाढून ते एकलकोंडे होतात. पुढे जाऊन मुले अधिक हट्टी होऊन त्यांच्याकडून हिंसात्मक गोष्टी घडण्याची शक्यता असते. मुलांच्या जडणघडणीत पालकांचे मोठे योगदान असते. त्यामुळे मुलांच्या बाबतीत आपले कर्तव्य बजावत असताना आपण कुठे चुकत आहोत, याचे पालकांनी देखील परीक्षण करणे गरजचे आहे.

                         – डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ञ, पिंपरी- चिंचवड.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news