राज्यात नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्रे ; नाशिक जिल्ह्यातील कळवण, बागलाण, इगतपुरी, त्र्यंबकचा समावेश | पुढारी

राज्यात नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्रे ; नाशिक जिल्ह्यातील कळवण, बागलाण, इगतपुरी, त्र्यंबकचा समावेश

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यात 692.74 चौ. कि. मी. क्षेत्राचे नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह तीन अभयारण्ये घोषित करण्यास सोमवारी (दि. 6) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यातील जवळपास निम्मे म्हणजे 312.45 चौ. कि. मी. क्षेत्र नाशिक जिल्ह्यातील कळवण, बागलाण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील आहे.

औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. वन क्षेत्रातील गावकर्‍यांचे पुनवर्सन आणि त्यांना देण्यात येणारा मोबदला याबाबत विश्वासात घेऊन चर्चा करा, असेही ठाकरे यांनी सांगितले. बैठकीस यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी तसेच वन्यजीव मंडळाचे सदस्य, तज्ज्ञ तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, केवळ सर्वेक्षणाच्या मान्यतेनंतर कधीकधी थेट प्रकल्पांना मान्यता मिळाल्याप्रमाणे कामे सुरु होतात. तसे होऊ नये याची काळजी घ्यावी. राज्यात आतापर्यंत एकूण 15 संवर्धन राखीव क्षेत्रे अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील 8 क्षेत्रांना गत दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, वनक्षेत्रातील रस्ते विकासांच्या कामांना मान्यता देताना वन्यजीवांच्या भ्रमण मार्गांची काळजी घेण्यात यावी. विशेषतः संवेदनशील तसेच व्याघ्र प्रकल्पातील कामांबाबत विशेष काळजी घेण्यात यावी.

राज्यातील 12 संवर्धन राखीव क्षेत्र : नाशिक : कळवण (84.12 चौ.कि.मी), बागलाण-मुरागड (42.87), त्र्यंबकेश्वर (96.97) व इगतपुरी (88.499); धुळे : चिवटीबावरी (66.04), अलालदारी (100.56); रायगड : रायगड (47.62), रोहा (27.30); पुणे : भोर (28.44), सातारा : दरे खुर्द (महादरे), फुलपाखरू (1.07), कोल्हापूर : मसाई पठार (5.34), नागपूर : मोगरकसा (103.92)

10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास
मयुरेश्वर – सुपे (5.145 चौ.किमी.), बोर (61.64), नवीर बोर (60.69), विस्तारित बोर (16.31), नरनाळा (12.35), लोणार वन्यजीव अभयारण्य (3.65), गुगामल राष्ट्रीय उद्यान (361.28 चौ.कि.मी), येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य (22.37), नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्य (29.90), देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य (2.17).

बोरगडला राज्यातील पहिल्या क्षेत्राचा दर्जा…
राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी जैवविविधतेमुळे नाशिक जवळील बोरगड जंगलाला राज्यातील पहिला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा दिला होता. त्यापाठोपाठ कंदीलपुष्प प्रजातीच्या संवर्धनासाठी र्त्यंबकेश्वर तालुक्यात अंजनेरीला, तर काळवीटच्या संरक्षणासाठी येवला तालुक्यातील ममदापूरला संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता नव्याने चार संवर्धन राखीव क्षेत्राची भर पडणार आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष होणार कमी…

नाशिक : जिल्ह्याला निसर्गाचे कोंदण लाभले असून, जैवविविधताही मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. मानवी हस्तक्षेपासह विकास प्रकल्पांमुळे वनक्षेत्रे अत्यंत वेगाने कमी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. तसेच वन्यप्राण्यांची नैसर्गिक आश्रयस्थाने नष्ट होऊन मानव-वन्यजीव संघर्षाला आमंत्रण मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संवर्धन राखीव वनक्षेत्रांची घोषणा केली आहे. त्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण तसेच मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये आरक्षित केलेल्या जागांना, राखीव वनक्षेत्राच्या संरक्षणापेक्षा उच्च दर्जाचे संरक्षण मिळणार आहे.

Back to top button