

हतनूर; पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील शिवना नदीवरील हतनूर गावातील कोल्हापूरी बंधारा फुटला. शिवना नदीवरील कोल्हापुरी बंधारा फुटल्यामुळे हाहाकार माजला आहे. कोल्हापुरी बंधारा फुटल्यामुळे हतनूर परिसरात तुफान पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, शिवना नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच शिवना टाकळी प्रकल्प १००% भरला असून सदर शिवना , गांधारी , निरगुडी नदीच्या पाण्याचा लोंढा सुरू असल्यामुळे पाणी सोडण्यात आले आहे .
कन्नड तालुक्यातील हतनूरसह परिसरात मुसळधार पाऊस झाला. गावभर गुडघा भर पाणी आल्याने वाहतूक काही काळ मंदावली होती. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते.
गावातील नागरिकांनी पूर्ण रात्र जागून काढली काही जणांचे धान्य, संसारोपयोगी साहित्य वाहून गेले तर शासकीय दवाखाना, ग्रामपंचायत, गावठाण्यातील झोपडपट्टी, मेनरोड आदी ठिकाणी पाणीच पाणी झाले.
अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. यावेळी उप विभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वाडकर, मंडळ अधिकारी सतिष भदाणे, तलाठी दिपक एरंडे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण नलावडे, पंचायत समिती सदस्य किशोर पवार यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.