

आजरा : पुढारी वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील हरपवडेपैकी धनगरवाड्यावरील सौ. रंजना जयवंत झोरे या गर्भवती महिलेला प्रसूतीकरिता दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नसल्याने चादरीतून पायी नेण्याची वेळ आली. तीन कि.मी.वर नावलकरवाडी येथे दवाखान्यात जाण्यापूर्वीच ओढ्याच्या पात्रात या महिलेची प्रसूती झाली. बाळ-बाळंतीण सुखरूप असले, तरी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही रस्ता नसल्याने नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
या धनगरवाड्यावर सुमारे वीस ते पंचवीस घरे आहेत. तेथे वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. तसेच धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्ताही नाही. रंजना झोरे यांना सोमवारी (दि. 21) रात्री नऊच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांना चादरीतून नावलकरवाडीला नेण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. धोंडिबा झोरे, जयवंत झोरे, राहुल झोरे, भागोजी झोरे यांनी चादरीचा पाळणा करून खाचाखळग्यांनी भरलेली व धोकादायक उतार असलेली जंगलातील पायवाट तुडविण्यास सुरुवात केली. तीव्र वेदनेमुळे या महिलेचा आकांत सुरू होता. त्यातच जंगलातील प्राणी, साप यांचीही भीती होती. दोन किलोमीटर अंतर पार करताच रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास 'कुमरीचा ओढा' या ठिकाणी महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मालुबाई झोरे व नकुशा झोरे या सोबतच होत्या. त्यानंतर नवजात बाळ व बाळंतीण यांना घेऊन एक किलोमीटर अंतर चालून नावलकरवाडी येथे आजरा ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.
जिल्ह्यात विविध नेत्यांकडून कोट्यवधी रुपये निधी आणल्याचे फलक चौकाचौकांत दिसतात. प्रत्यक्षात यंत्रणांचा गलथानपणा व सुविधांचा अभाव, असे चित्र आहे. शिरोली येथे अलीकडेच डॉक्टर हजर नसल्याने महिलेची दवाखान्याच्या दारातच प्रसूती झाली आणि नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. त्यानंतर रस्त्याअभावी असा धोकादायक प्रवास करावा लागल्याची घटना घडली.
वासनोलीपैकी जोगेवाडी धनगरवाड्यावर पावसाळ्यात डालग्याची डोली करून संगीता शिवाजी फटकारे यांना प्रसूतीसाठी दवाखान्यात नेत असताना वाटेतच प्रसूती झाली. ही घटना 19 जून 2021 रोजी घडली. याच महिन्यात 6 जून रोजी एरंडपे धनगरवाड्यावरील संगीता फोंडे यांना घोंगडीची डोली करून प्रसूतीसाठी दवाखान्यात दाखल करत असताना पोटातच बाळाचा गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने सुनीता वाचली. धनगरवाड्यांवर बारमाही वाहतुकीची व्यवस्था नसल्याने त्यांच्या पाचवीलाच संघर्ष पुजलेला आहे. येथील रस्त्यांसाठी वन विभागाचा प्रमुख अडसर असतो.