कर्नाटक : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येवरुन गदारोळ | पुढारी

कर्नाटक : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येवरुन गदारोळ

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

शिमोग्यातील बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचा हात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद यांनी केला. विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर त्यांनी हत्येच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांच्याकडे केली. या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून करावी. रविवारी हर्ष नामक युवकाची हत्या झाली. हा युवक बजरंग दलाचा सक्रिय कार्यकर्ता होता. त्या युवकाच्या मातेने दोन वर्षांपूर्वी शिमोगा जिल्हा पोलिसांना आपला मुलगा बजरंग दलामध्ये नसल्याचे लिहून दिले होते.

  • दिलासादायक! देशात २४ तासांत १५ हजार नवे रुग्ण, २७८ जणांचा मृत्यू
    ईश्वरप्पा मंत्री आहेत. गृहमंत्री अरग ज्ञानेंद्रही शिमोगा जिल्ह्यातीलच आहेत. पोलिसांनी तपास करण्याआधीच ईश्वरप्पा यांनी गुंडांकडून त्या युवकाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. हा शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे. ईश्वरप्पा यांनी राष्ट्रध्वजाविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या वादातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी युवकाची हत्या करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप हरिप्रसाद यांनी केला. हरिप्रसाद यांच्या आरोपाचा भाजप आमदारांनी तीव्र निषेध केला. यावरुन सत्तारूढ आणि विरोधी आमदारांमध्ये शाद्बिक चकमक झाली. भाजप आमदार वाय. ए. नारायणस्वामी, भारती शेट्टी, तेजस्विनी गौडा, एम. के. प्राणेश यांनी आक्षेप घेतला. हरिप्रसाद यांनी ईश्वरप्पांविरुद्ध घोषणाबाजी केली. यानंतर गदारोळ झ्राला.
  • हिजाब प्रकरण : याचिकाकर्त्या विद्यार्थिनीच्या भावावर हल्ला

बुधवारीही तणाव कायम

बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची निर्घृण हत्या केल्यानंतर निर्माण झालेला तणाव कायम आहे. बुधवारी सकाळपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शिमोगा जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मीप्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली.
तणावामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. दुकाने बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. आवश्यकतेवेळी कर्फ्यू पुढे सुरु ठेवण्यात येणार आहे. शिमोगा जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस फौजफाटा मागवण्यात आला आहे.

हत्येचा कसून तपास : गृहमंत्री ज्ञानेंद्र

शिमोगा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा कसून तपास केला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दिले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, हिजाब प्रकरणात त्याची हत्या झाली का? यामागे कोणती संघटना आहे? हत्येसाठी कुणी पैसे दिले होते का? अशा विविध दृष्टीकोनातून तपास सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, याची काळजी घेतली जाईल. बाराजणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. घटनेची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पाहणी करत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सूचना देण्यात आली आहे. शिमोग्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी आपल्या विधानाचे समर्थन करताना गुंडांनीच हर्षची हत्या केल्याचा पुनरुच्चार केला. सोमवारी शिमोगा जिल्हा पोलिसप्रमुखांशी चर्चा करुनच विधान केले होते. अटक केलेल्यांमध्ये मुस्लीम युवकांचा समावेश आहे. त्यामुळे ही हत्या गुंडांनीच केल्याचे ईश्वरप्पा
म्हणाले.

सिद्धरामय्या

हर्षची हत्या, त्यानंतर झालेली दगडफेक, जाळपोळ, जमावबंदी या सर्व घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
गेल्या तीन दिवसांत शिमोगा येथे तीन हत्या झाल्या आहेत. या जिल्ह्यामध्ये गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, मंत्री के. एस. ईश्वरप्पा, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा राहतात. राजकीयदृष्ट्या हा जिल्हा प्रभावी आहे. असे असतानाही येथे गेल्या तीन दिवसांत तीन हत्या होणे दुर्दैवी आहे. या घटनांमुळे राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचलत का ? 

Back to top button