नाशिक मनपा : ‘स्थायी’कडून अंदाजपत्रकात 339 कोटींची वाढ | पुढारी

नाशिक मनपा : ‘स्थायी’कडून अंदाजपत्रकात 339 कोटींची वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्थायी समितीने सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात 339 कोटींची वाढ केल्याने आयुक्तांनी सादर केलेले 2227 कोटींचे अंदाजपत्रक 2567 कोटींपर्यंत पोचले आहे. प्रभागातील विकास कामांसाठी 272 कोटींची तरतूद करण्यात आली असून, नगरसेवकांचा प्रभाग विकास निधी 30 लाखांवरून 50 लाख इतका केला आहे.

स्थायी समितीने विकास कामांच्या निधीत वाढ करण्याबरोबरच महापालिकेच्या उत्पन्नात 340 कोटींची वाढ सूचविली आहे. या उत्पन्नात बीओटी तत्वावर विकसीत केल्या जाणार्‍या मालमत्तांपोटी 187 कोटी उत्पन्न मिळण्याची अंदाज गृहीत धरण्यात आला आहे. सभापती गणेश गिते यांनी अंदाजपत्रकाचा ठराव मंजूर करून महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. कोणत्याही प्रकारची कर दरवाढ न करता 2022-23 या आर्थिक वर्षाचे 2227 कोटींचे प्रारूप अंदाजपत्रक आयुक्त कैलास जाधव यांनी गेल्या 8 फेब—ुवारीला स्थायी समितीला सादर केले होते. अंदाजपत्रकात आयटी हब, नमामि गोदा, स्मार्ट स्कूल, परिवहन सेवा, रस्ते विकास, बिटको रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय या प्रकल्पांसाठी सत्ताधारी भाजपने भरीव तरतूद केली आहे.

नगरसेवकांचा स्वेच्छा निधी व प्रभाग विकास निधीसाठी अनुक्रमे 12.25 कोटी व 41.40 कोटींची तरतूद वगळता अन्य नव्या कामांसाठी 85 कोटी 98 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीतून येणार्‍या नगरसेवकांना विकास कामांसाठी फारसा निधीच उपलब्ध होणार नाही. परंतु, स्थायी समितीने नवीन नगरसेवकांची निराशा दूर करण्यासाठी 339 कोटी 97 लाखांची वाढ केली आहे. यात अंतर्गत रस्ते, कॉलनी रस्ते डांबरीकरण, अस्तारीकरण, आयटी हब जागेतील रस्ते, तारवाला नगर येथील उड्डाणपुलासाठी तरतूद, सिंहस्थासाठी जमीन भूसंपादन, वादग्रस्त उड्डाणपुलांसाठी 104 कोटी, गोदावरी किनार्‍यावर नमामि गोदा प्रकल्पांतर्गत मुख्य मलवाहिका दुरूस्ती व अन्य कामांचा समावेश करण्यात आला आहे.

नव्याने झालेल्या 44 प्रभागातील विकास कामांसाठी भरीव निधी मिळावा या उद्देशाने प्रभाग विकास निधीत वाढ केली आहे. अंदाजपत्रकात 339 कोटींनी वाढ केली असून, उत्पन्नातही तेवढीच वाढ केली आहे. नव्याने निवडून येणार्‍या नगरसेवकांसाठी भरघोस निधी उपलब्ध होणार आहे. – गणेश गिते, सभापती ,स्थायी समिती

प्रभाग विकास निधी 69 कोटी

प्रभाग विकास निधीअंतर्गत 133 नगरसेवकांसाठी प्रत्येकी 30 लाख याप्रमाणे 41 कोटी 40 लाखांची तरतूद आयुक्तांच्या अंदाजपत्रकात करण्यात आली होती. सभापती गिते यांनी त्यात प्रत्येकी 20 लाखांची वाढ केल्याने प्रत्येक नगरसेवकाच्या हाती प्रभाग विकास निधी 50 लाख इतका पडणार आहे. यामुळे आता अंदाजपत्रकात प्रभाग विकासासाठी 69 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button