

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील तीन जिल्ह्यांमध्ये वेस्ट नाइल तापाचे (Kerala West Nile fever cases) रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर केरळच्या आरोग्य विभागाने डास-नियंत्रण उपायांसाठी ॲडव्हाजरी जारी केली आहे. मलप्पूरम, कोझिकोड आणि त्रिशूर जिल्ह्यात वेस्ट नाइल तापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. केरळ सरकारने सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत आणि मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.
वेस्ट नाइल हा विषाणू असून जो डास डावल्याने पसरतो. या विषाणूच्या संक्रमणामुळे बहुतांश लोकांना लक्षणे दिसून येत नाहीत. ५ पैकी एका व्यक्तीला ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी फ्लू सारखी लक्षणे दिसून येतात. परंतु गंभीर प्रकरणांमध्ये वेस्ट नाइलमुळे मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये (एन्सेफलायटीस आणि मेंदुज्वर) गंभीर सूज होऊ शकते.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, केरळच्या उत्तरेकडील जिल्हा कोझिकोडमध्ये पश्चिम नाइल तापाच्या ५ प्रकरणांची पुष्टी झाली आहे. जिल्हा देखरेख पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की ते राहत असलेल्या भागातून कोणत्याही नवीन प्रकरणाची नोंद झालेली नाही. त्यांनी म्हटले आहे की, सध्या एका व्यक्तीला डासजन्य संसर्ग झाल्याची शक्यता आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
वेस्ट नाइल विषाणूचा प्रसार डासांच्या चाव्यामुळे होतो. हा व्हायरस माणसापासून माणसामध्ये पसरत नाही.
वेस्ट नाइल व्हायरसचे हे नाव युगांडाच्या वेस्ट नाइल जिल्ह्याच्या नावावरुन ठेवले आहे. जिथे तो पहिल्यांदा आढळून आला होता. वेस्ट नाइल विषाणूमुळे घातक न्यूरोलॉजिकल रोग होऊ शकतात. केरळ आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, याचा प्रामुख्याने संक्रमित डासांच्या चावण्याने फैलाव होतो. वेस्ट नाइल विषाणूजन्य संसर्ग पहिल्यांदा युगांडामध्ये १९३७ मध्ये आढळून आला होता. केरळमध्ये हा विषाणू पहिल्यांदा २०११ मध्ये आढळून आला होता. २०१९ मध्ये मलप्पूरममधील एका सहा वर्षांच्या मुलाचा वेस्ट नाइल विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यानंतर २०२२ मध्ये थ्रिसूर जिल्ह्यातील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा पश्चिम नाइल विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला होता.
वेस्ट नाइल एक आर्बोव्हायरस आहे. हा फ्लेविव्हायरस वंशाचा आरएनए विषाणू आहे. असे विषाणू डेंग्यू ताप, पिवळा ताप आणि झिकाचे कारण बनतात. तुम्हाला गंभीर न्यूरोलॉजिकल लक्षणे आढळल्यास डॉक्टराकडे जाऊन उपचार घ्यावेत.
संक्रमित डास पश्चिम नाइल विषाणूचा फैलाव करतात. त्यांच्याकडे संक्रमित पक्ष्यापासून हा विषाणू येतो. त्याचा मानवांमध्ये थेट पक्ष्यांकडून फैलाव होत असल्याचा कोणताही पुरावा नाही. हा विषाणू डासांच्या आत वाढतो. जेव्हा तो तुम्हाला चावतो तेव्हा तुमच्यापर्यंत (अथवा अन्य प्राणी) पसरतो. त्याचा लक्षणे दिसेपर्यंतचा कालावधी १४ दिवसांचा असू शकतो.
वेस्ट नाइल संक्रामक नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही.
हे ही वाचा :