

वॉशिंग्टन : दरवर्षी 365 दिवसांनंतर कॅलेंडर बदलले जाते. अनेकांसाठी 365 दिवसही अधिक वाटत असतात. अशावेळी जर आपल्याला 18,980 दिवसांनंतर कॅलेंडर बदलण्याची वेळ आली तर? 18,980 दिवस म्हणजेच 52 सौर वर्ष माया कॅलेंडरला सर्वात दीर्घ कालचक्र बनवतात. संशोधकांनी म्हटले आहे की हे कॅलेंडरही अनुमानापेक्षा अधिक जुने आहे. त्याचा वापर हजारो वर्षांपासून उत्तर आणि मध्य अमेरिकेतील लोक करीत आले.
पुरातत्त्व संशोधकांनी मेसोअमेरिकन टाईमकिपिंग आणि लेखन प्रणालींशी निगडीत अनेक स्मारक आणि चित्रांचा शोध लावला आहे. अर्थात अजूनही माया कॅलेंडर नेमके किती जुने आहे याचा अचूक अंदाज लावता आलेला नाही. अलीकडेच संशोधकांना माया कॅलेंडरचे अवशेष सापडले आहेत. त्यावरून असे दिसून येते की माया संस्कृतीत चिन्हांशिवाय लेखनीचाही वापर बर्याच आधीपासून केला जात होता. 'सायन्स अॅडव्हान्स' नावाच्या नियतकालिकात याबाबतची माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की संशोधकांना ग्वाटेमालामध्ये माया संस्कृतीमधील एक पुरातत्त्व स्थळ असलेल्या सॅन बार्टोलो येथे चुना प्लास्टरपासून बनवलेले दोन तुकडे मिळाले आहेत. त्याच्या वरच्या भागात एक सात हरणांचे चिन्ह असून दुसरा तुकडा लेखन परंपरेकडे निर्देश करणारा आहे. हा तुकडा आता संशोधकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे.
माया संस्कृतीमधील लेखनाचा विकास यामधून समजून घेता येऊ शकेल असे संशोधकांना वाटते. याशिवायही 249 अन्य तुकडे मिळाले आहेत. हे तुकडे लास पिंटुरास पिरॅमिडच्या परिसरात सापडले. या चुना प्लास्टरवरील कॅलेंडरमध्ये 260 दिवसांचे एक वर्ष आहे. '7 हरिण' या कॅलेंडरमध्ये एका दिवसाचा संकेत करतात. रेडिओ कार्बन डेटिंगने असे दिसून आले की हे कॅलेंडर इसवी सनापूर्वीच्या 300 या काळातील आहे.