युद्धात होरपळते बालपण

युद्धात होरपळते बालपण
Published on
Updated on

'सेव्ह द चिल्ड्रेन'च्या अहवालानुसार, युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) 80 हजार मुले अद्याप मातेच्या पोटात आहेत. त्यांना अजून जन्म घ्यायचा आहे. युद्धाच्या परिस्थितीत या मातांना प्रसूतीच्या सुविधा कशा पुरवल्या जाणार? रुग्णालये कोलमडून पडलेली असताना औषधांचा आणि अन्य सुविधांचा दुष्काळ असताना हे सर्व कसे काय होणार? मातृत्वाच्या आणि बालकांच्या हक्कांवरच हा हल्ला नाही का? युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्रांनी तोंड बंद का ठेवले आहे?

जगात शांतता केवळ बुद्धाच्या मार्गाने येईल, युद्धाने नाही. युद्धाचा सर्वांत वाईट परिणाम लहान मुलांवर होतो. जगभर युद्धात हजारो निष्पाप लोक मारले गेले आहेत. जागतिक मंचावर बालहक्कांविषयी बोलणार्‍या संस्था अशा वेळी हात बांधून उभ्या राहतात. युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही.

अशा स्थितीत संयुक्त राष्ट्र, युनिसेफ, नाटोसारख्या जागतिक संघटनांना काय अर्थ उरतो? रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे जगातील सर्वांत शक्तिशाली नेते म्हणून नावारूपाला आले आहेत. त्यांच्या आग्रहापुढे घटनात्मक जागतिक संस्था निरर्थक ठरल्या आहेत. जगभरातील देशांनी पुतीन यांना युद्ध थांबविण्याचे आवाहन केले; परंतु त्यांनी कोणाकडेही लक्ष दिले नाही. (Russia Ukraine War)

संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि नाटो तसेच युरोपीय महासंघ यांसारख्या संघटनांनी सर्व निर्बंध लादूनही पुतीन यांना युद्धविरामासाठी राजी करणे कुणालाही जमले नाही. युक्रेन उद्ध्वस्त होत असताना अशा संस्थांना फक्त वरवरच्या मलमपट्टीत रस आहे, असे दिसून आले. युक्रेन आणि रशियाच्या लोकांना युद्ध अजिबात नको होते. परंतु दोन्ही देशांच्या राजकारण्यांनी आपापल्या देशाला युद्धाच्या खाईत ढकलले.

खरे तर याची जाणीव व्लादिमीर पुतीन आणि झेलेन्स्की या दोघांना कदाचित होतही असेल. युद्धाच्या भीषणतेतून सावरल्यानंतर पुतीन आणि झेलेन्स्की यांच्या हाती नेमके काय लागणार, याचाही विचार दोन्ही नेत्यांना करावा लागेल. कारण रशियातही पुतीन यांच्या निर्णयाविरोधात सामान्य नागरिकांनी निदर्शने केली आहेत. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी ओलेना यांनी रशियन सैनिकांच्या मातांना एक हृदयस्पर्शी आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'बघ… तुझी मुले आमच्या पतींची, मुलांची आणि भावांची कशी हत्या करत आहेत.

कोणत्याही आईला मुलाची हत्या होताना पाहवत नाही.' रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 144 पेक्षा अधिक निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे, तर अडीचशेपेक्षा अधिक मुले जखमी झाली आहेत. युद्धाच्या भीषणतेचा रशिया आणि युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दुष्परिणाम होईल. कारण युरोपीय महासंघाने रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. युद्ध संपल्यानंतर चीन आणि भारत जागतिक निर्बंधांना बगल देऊन रशियाला कितपत मदत करतील, या प्रश्नाचे उत्तर भविष्याच्या अंधारात आहे.

ज्यांच्या हातात खेळणी, पुस्तके असावीत आणि हृदयात स्वप्ने असावीत… अशा युक्रेनमधील निष्पाप बालकांना वेदनादायक मृत्यूला सामोरे जावे लागत आहेे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. रुग्णालये बेचिराख झाली आहेत. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे अनेक मुले अनाथ झाली आहेत. परंतु संपूर्ण जग या सर्व घटना मूकपणे पाहत आहे. (Russia Ukraine War)

'सेव्ह द चिल्ड्रेन' संस्थेच्या अहवालानुसार युक्रेनमधील 6 दशलक्ष मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे. 464 शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. रुग्णालयांतील उपचार सुविधा बंद पडल्या आहेत. युक्रेनमधील 7.5 दशलक्ष मुलांपैकी 1.5 दशलक्ष मुलांनी युद्धामुळे देश सोडला आहे. युद्धाचा धोका अद्याप संपलेला नाही. युक्रेनची राखरांगोळी होत असताना संयुक्त राष्ट्रे आणि जग काहीही करू शकलेले नाही. जर हेच रशियाच्या बाबतीत घडले असते, तर आज काय परिस्थिती असती?

'सेव्ह द चिल्ड्रेन'च्या अहवालानुसार, युक्रेनमध्ये 80 हजार मुले अद्याप मातेच्या पोटात आहेत. त्यांना अजून जन्म घ्यायचा आहे. युद्धाच्या परिस्थितीत या मातांना प्रसूतीच्या सुविधा कशा पुरवल्या जाणार? रुग्णालये कोलमडून पडलेली असताना औषधांचा आणि अन्य सुविधांचा दुष्काळ असताना हे सर्व कसे काय होणार? मातृत्वाच्या आणि बालकांच्या हक्कांवरच हा हल्ला नाही का? युनिसेफ आणि संयुक्त राष्ट्रांनी तोंड बंद का ठेवले आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युद्ध थांबविण्याचा आदेश दिल्यानंतरही युद्ध थांबलेले नाही.

युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. एक युद्ध भविष्यातील अनेक युद्धांची पायाभरणी करत असते. प्रश्न केवळ युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा नाही. अफगाणिस्तान, येमेन, इराक, सीरिया आणि सोमालिया यांसारख्या देशांचाही आहे. तिथे लाखो मुलांना जीव गमवावा लागला आहे. मात्र मुलांच्या हक्कांबाबत संपूर्ण जग मूग गिळून आहे.

नॉर्वेजियन पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, तीन वर्षांपूर्वी, 2019 मध्ये 160 दशलक्ष मुले युद्धक्षेत्रात राहत होती. युनिसेफच्या अहवालानुसार, सीरियातील युद्धादरम्यान दर दहा तासांनी एका मुलाचा मृत्यू होतो. या काळात दहा लाखांहून अधिक मुलांचा जन्म झाला. युद्धात 5427 मुले मृत्युमुखी पडली. 2018 पर्यंत अफगाणिस्तानातील युद्धात 5 हजार मुलांचा मृत्यूू झाला. या काळात लाखो लोक निर्वासित झाले. (Russia Ukraine War)

लाखो मुलांना शिक्षण सोडावे लागले. येथे दर 10 मिनिटांनी एका बालकाचा आजाराने मृत्यू होत होता. युद्धादरम्यान येथे 1427 मुले मरण पावली. येथे 4 लाखांहून अधिक बालके कुपोषणाची बळी ठरली. युद्धामुळे दोन लाख मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. 17 लाख मुलांच्या कुटुंबीयांना विस्थापित व्हावे लागले.

1991 मधील युद्धाच्या पहिल्या नऊ महिन्यांत सोमालियामध्ये 1800 मुले मरण पावली. 1278 मुलांचे अपहरण झाले. 10 पैकी 6 आजारी बालकांना उपचारांची सुविधाही मिळालेली नाही. 2003 ते 2011 या काळात इराकमध्ये अमेरिकेच्या लष्करी कारवायांमध्ये अनेक मुले मरण पावली. युद्धामुळे मुलांना रुग्णालयांत उपचारही मिळू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला.

जगभरातील युद्धग्रस्त भागात बालहक्क दुर्लक्षित करण्यात आले आहेत. या प्रश्नांवर जबाबदार यंत्रणांकडून योग्य ती पावले उचलली गेली नाहीत. युनिसेफसारख्या संस्थांनी फक्त आकडेच मांडले. यावर संयुक्त राष्ट्र संघासारख्या संस्थांनी सर्वसमावेशक धोरण आखले पाहिजे. युद्धक्षेत्रातील लाखो मुलांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. बाल हक्कांबाबत जगातील देशांनी एका व्यासपीठावर यायला हवे.

शुभांगी कुलकर्णी, समाजशास्त्र अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news