80 वर्षांच्या आजीबाई रोज खातात वाळू! | पुढारी

80 वर्षांच्या आजीबाई रोज खातात वाळू!

वाराणसी ः काही लोकांना खाण्या-पिण्याच्या अतिशय विचित्र सवयी असतात. अशीच एक वृद्ध महिला उत्तर प्रदेशात वाराणसी येथे आहे. कुसुमावती नावाची ही 80 वर्षे वयाची महिला रोज 500 ग्रॅम वाळू खाते. रोज अशी अर्धा किलो वाळू खाऊनही या आजीबाईंची तब्येत ठणठणीत आहे.

या आजीबाई वयाच्या अठराव्या वर्षापासून वाळू खात आहेत हे विशेष. त्या वाळू खाऊन ती पचवूनही दाखवतात. अर्थातच डॉक्टरांनी वाळू खाणे हे धोकादायक ठरू शकते असा इशारा दिलेला आहे. कुसुमावती नेहमीचा आहारही घेत असतात; पण वाळू खाण्याचीही त्यांना चटक लागलेली आहे.

त्या अठरा वर्षांच्या असताना कुणी तरी त्यांना एका आजारावर उपचार म्हणून गोवरीची राख खाण्यास सांगितले होते. त्यांनी अशी राख खाणे सुरू केले आणि हळूहळू त्या वाळूही खाऊ लागल्या. कालांतराने ही त्यांना सवयच जडली. त्या या वयातही स्वतः कुठे तरी जाऊन वाळू घेऊन येतात.

ही वाळू त्या स्वच्छ धुवून वाळवतात आणि खाऊन टाकतात. त्यांची मुलं त्यांना वाळू खाण्यापासून मज्जाव करण्याचा प्रयत्न करतात; पण त्या आपली सवय सोडण्यास तयार नाहीत. आपण वाळू खाल्ली नाही तर आपल्याला झोप येत नाही, असे त्या सांगतात. कुसुमावती एक पोल्ट्री फार्म चालवतात आणि या वयातही सक्रिय जीवन जगतात.

 

Back to top button