सांगली :धुळेच्या बदल्यात सांगली; काँग्रेसचा भाजपला प्रस्ताव | पुढारी

सांगली :धुळेच्या बदल्यात सांगली; काँग्रेसचा भाजपला प्रस्ताव

सांगली : पुढारी वृत्तसेवा : धुळे महानगरपालिकेची प्रभाग 5 ब ची पोटनिवडणूक भाजपसाठी बिनविरोध करण्याच्या बदल्यात सांगली महानगरपालिकेची प्रभाग 16 अ ची पोटनिवडणूक काँग्रेससाठी बिनविरोध करण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून पुढे आला आहे. बिनविरोध पोटनिवडणुकीसंदर्भात पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे भाजप व काँग्रेसचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनाने प्रभाग 16 अ ची पोटनिवडणूक लागली आहे. हारुण शिकलगार यांचे पुत्र तौफिक यांना काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. दरम्यान, काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्यात धुळे महपाालिका प्रभाग 5 ब, अहमदनगर महापालिका प्रभाग 9 क, नांदेड वाघाळा महापालिका प्रभाग 13 अ आणि सांगली मिरज व कुपवाड शहर महापालिका प्रभाग 16 अ साठी पोटनिवडणूक सुरू आहे. धुळे येथील प्रभाग 5 ब मध्ये भाजपचे नगरसेवक होते, तर सांगलीत 16 अ मध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते. या दोन्ही जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक होत आहे.

धुळे महानगरपालिकेची प्रभाग 5 ब ची पोटनिवडणूक भाजपसाठी बिनविरोध करण्याच्या बदल्यात सांगली महापालिकेची प्रभाग 16 अ ची पोटनिवडणूक काँग्रेससाठी बिनविरोध करण्याचा प्रस्ताव सांगलीत काँग्रेसमधून पुढे आला आहे. काँग्रेसमधील एका नगरसेवकांनी त्याला दुजोरा दिला.

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
भाजप कोअर कमिटी बैठक उद्या महापालिकेतील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भाजप नेत्यांची भेट घेऊन बिनविरोध निवडणुकीसाठी विनंती केली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही प्रदेश काँग्रेसस्तरावरून विनंती केली जाणार आहे. दरम्यान, भाजपने शनिवारी प्रभाग 16 मधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी आग्रही पवित्रा घेतला. भाजपचे नेते शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, गटनेते विनायक सिंहासने यांनी भाजप कार्यकर्त्यांचे मत आजमावून घेतले आहे.

त्यावर बुधवारी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांना अहवाल पाठविला जाणार आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम राहणार आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे भाजपसह काँग्रेसचेही लक्ष लागले आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा पहिला दिवस होता. या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी ही माहिती दिली.

निवडणूक कार्यक्रम

  • उमेदवारी अर्ज स्वीकारणे : 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर
  • उमेदवारी अर्ज मागे : 9 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत
  • मतदान : 21 डिसेंबर 2021
  • मतमोजणी : 22 डिसेंबर 2021

Back to top button