मंगळ ग्रहावर कसरती दाखवत आहे ‘इंजिन्युटी’ हेलिकॉप्टर! | पुढारी

मंगळ ग्रहावर कसरती दाखवत आहे ‘इंजिन्युटी’ हेलिकॉप्टर!

मंगळ ग्रहावर असलेल्या ‘नासा’च्या ‘इंजिन्युटी’ हेलिकॉप्टरचा एक व्हिडीओ आता या अंतराळ संस्थेने सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यामध्ये इंजिन्युटी हेलिकॉप्टर जणू काही हवेत कसरतीच करीत असल्यासारखे दिसते. अर्थात या व्हिडीओमध्ये हे हेलिकॉप्टर मंगळाच्या पृष्ठभागावरून टेकऑफ करीत असताना तसेच लँडिंग करताना दिसते.

या व्हिडीओला ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरवर लावलेल्या ‘मास्टकॅम-झेड’ या उपकरणाच्या सहाय्याने रेकॉर्ड करण्यात आले आहे. ‘इंजिन्युटी’ने 4 सप्टेंबरला मंगळावरील आपले तेरावे उड्डाण केले होते. मंगळावर उड्डाण करणारे ते पहिलेच रोटरक्राफ्ट आहे. आकाशातून मंगळभूमीची विविध छायाचित्रे काढण्याचे तसेच नवी निरीक्षणे नोंदवण्याचे काम हे हेलिकॉप्टर करीत आहे.

त्याच्या टेकऑफ व लँडिंगचा व्हिडीओ तयार करण्याचे कारणही वैज्ञानिक होते. हेलिकॉप्टरमुळे निर्माण होणार्‍या धुळीच्या ढीगाचे मोजमाप घेण्यासाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 3 सेकंदांच्या या व्हिडीओच्या प्रारंभी इंजिन्युटी हेलिकॉप्टर फ—ेमच्या खालील बाजूस डावीकडे दिसून येते. हे हेलिकॉप्टर रोव्हरपासून सुमारे 980 फूट अंतरावर होते.

Back to top button