सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : पळाऽ पळाऽऽ मतदार आणा..! | पुढारी

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : पळाऽ पळाऽऽ मतदार आणा..!

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी गुप्त घडामोडींना वेग आला आहे. अनेक उमेदवारांनी आपले निश्चित असणारे मतदार अज्ञातस्थळीत नेवून ठेवले आहेत. शेवटचा एकच दिवस राहिल्याने टाईट फिल्डींग लागली असून मतदार आणण्यासाठी पळापळ सुरु झाली आहे. मतदान केंद्रांवरही गाड्या व मतदारांवर वॉच ठेवला जाणार आहे.

सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 11 जागा बिनविरोध झाल्या असून 10 जागांसाठी निवडणूक लागली आहे. बँकेत सत्ताधारी सहकार पॅनेलचा प्रचार सुरू आहे. तर विरोधकांकडूनही गाठी भेटींचा सिलसिला सुरूच आहे. यंदा विरोधी पॅनल नसले तरी सत्ताधार्‍यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार रिंगणात आहेत.

सत्ताधार्‍यांच्या बैठका व मेळावे होत असले तरीही त्यांना मात्र गर्दी होत नसल्याचे चित्र आहे. त्यासाठी रिंगणात असणार्‍या उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठी भेटींवर भर दिला आहे. प्रत्येक उमेदवारांच्या दोन फेर्‍या झाल्या आहेत. जाहीर प्रचारांची सांगता शुक्रवारी झाली. त्यामुळे पडद्यामागील घडामोडींना वेग आला आहे.

शनिवारपर्यंत हे प्रकार जोरात चालणार आहेत. जावली, कराड, माण, खटाव, पाटण, कोरेगाव सोसायटी या मतदारसंघात कांटे की टक्कर होत आहे. त्यामुळे याठिकाणी मतदारांना वळवण्यासाठी गुप्त हालचाली जोरात सुरू आहेत. सर्व प्रकारची अमिषे मतदारांना दाखवली जात आहेत.

प्रामुख्याने रात्रीच्या घडामोडींना वेग आला आहे. निश्चित झालेले मतदान अज्ञातस्थळी ठेवले जात आहे. त्यांची सर्व प्रकारची सरबराई केली जात आहे. प्रचाराची सांगता शुक्रवारी होत असल्याने सर्वच नेते जिल्ह्यात आले आहेत.

काठावर असलेले मतदान फोडण्यासाठी नेते व उमेदवार यांचे नियोजन सुरू आहे. अंतिम टप्प्यात क्रॉस व्होटींगसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला मतदान जास्तीत जास्त व्हावे, यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

पाहा व्हिडिओ :  मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी कसा बनला

Back to top button