अपघात : पुणे- उसाच्या ट्रॉलीवर मोटार आदळली; एक ठार, तीन जखमी | पुढारी

अपघात : पुणे- उसाच्या ट्रॉलीवर मोटार आदळली; एक ठार, तीन जखमी

आळेफाटा (पुणे) ; पुढारी वृत्तसेवा

ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मोटारीने पाठीमागून भरधाव वेगाने धडक दिली. या अपघातामध्ये एकजण ठार झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले. हे सर्वजण नगरकडून आळेफाटा येथे जात असताना (शुक्रवार) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी (जुन्नर) शिवारात हा अपघात झाला. संजय मारुती गगे (रा. नळावणे) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. योगेश धोंडिबा आहेर, संदीप पोपट शिंदे असे गंभीर जखमी झालेल्‍यांची नावे आहेत.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी शिवारातून क्रांती शुगर फॅक्टरीकडे उसाने भरलेला ट्रॅक्टर (एम.एच १६ केव्ही ६४८६) विना नंबरच्या दोन ट्रॉली घेऊन जात होता. त्याच दरम्यान रस्त्यावरून जाणारी मोटार ट्रॉलीला पाठीमागून जाऊन धडकली. जोरदार धडक बसल्याने मोटारीचा चक्काचूर झाला.

धडक इतकी जोराची होती की, मोटारीमधील संजय मारुती गगे जागीच ठार झाले. उर्वरित दोन जखमींना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले करण्यात आले. अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटार चालक राहुल भास्कर हाडवळे यांच्या विरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरच्या विनानंबर डबल ट्रॉलीला मागे रिफलेक्टर नसल्याने चालकाला अंदाज न आल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींचे म्हणणे आहे.

Back to top button