Pandu Film : ‘पांडू’ने दिल्या ‘झिम्मा’ला शुभेच्छा | पुढारी

Pandu Film : 'पांडू'ने दिल्या 'झिम्मा'ला शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन :

मराठी चित्रपटसृष्टी एका मोठ्या कुटुंबासारखी आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकार एकमेकांना नेहमीच आधार आणि प्रोत्साहन देत असतात. असाच एक अनुभव नुकताच आला. मल्टीस्टारर ‘झिम्मा’ हा चित्रपट १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. ‘झिम्मा’च्या टीमने ‘पांडू’ (Pandu Film) चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी ‘झिम्मा’ चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. (Pandu Film)

‘पांडू’च्या टीमला ‘झिम्मा’चित्रपट खूप आवडला आणि त्यांनी दिग्दर्शक तसेच त्यातील सर्व कलाकारांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. ‘पांडू’ चित्रपटाच्या टीमने ‘झिम्मा’ला शुभेच्छा दिल्या. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहे प्रेक्षकांसाठी खुली झाली असून अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातच ‘झिम्मा’ तसेच ‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत ‘पांडू’ असे दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

‘झिम्मा’ चित्रपटाचा ट्रेलर तसेच गाण्यांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाप्रमाणेच चित्रपटलादेखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळेल अशी आशा आहे. ‘झी स्टुडिओज’सारख्या नावाजलेल्या कंपनीने ‘झिम्मा’ला भरभरून शुभेच्छा आणि पाठिंबा दर्शवला आहे.

‘झिम्मा’ चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे आहेत.

सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. क्षिती जोग, स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘पांडू’ चित्रपटाच्या मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल ‘झिम्मा’ चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतात, दोन मराठी चित्रपटांनी एकमेकांचे पाय न ओढता एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. अभिमानास्पद यासाठी कारण हिंदी चित्रपटसृष्टीत हे सहसा दिसत नाही. हे केवळ मराठीतच होऊ शकते.

‘झी स्टुडिओ’ने नेहमीच मराठी चित्रपटांना आधार दिला आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे वेगळे बळ मिळाले आहे. लॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टीचा नव्याने प्रवास सुरु होतोय. या प्रवासात प्रेक्षकांची साथ महत्वाची आहेच. मराठी मनोरंजनसृष्टीचा सोहळा सुरु झाला असून हा आनंद अनुभवण्यासाठी या सोहळ्यात मराठी रसिक प्रेक्षक नक्कीच सामील होतील.

Back to top button