Plastic Eater Fungus : झाडावर वाढणारी ‘ही’ बुरशी खाऊ शकते प्लास्टिक! | पुढारी

Plastic Eater Fungus : झाडावर वाढणारी ‘ही’ बुरशी खाऊ शकते प्लास्टिक!

न्यूयॉर्क : Plastic Eater Fungus : प्लास्टिकचे पाणी किंवा मातीत विघटन होत नाही. ते नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षांचा काळ लागतो. त्यामुळे असा प्लास्टिकचा कचरा साठून राहतो आणि पर्यावरणाला तसेच आरोग्यालाही धोकादायक बनतो. या कचर्‍यावर कोणता उपाय करावा याच्या शोधात जगभरातील संशोधक असतात. आता त्यांना जंगलातील एका विशिष्ट बुरशीचा शोध लागला आहे. ही बुरशी पडलेल्या झाडांवर वाढते आणि हे लाकूड खाऊन कार्बन डायऑक्साईड सोडते. मात्र, तिला तिचे नेहमीचे ‘खाद्य’ मिळाले नाही तर ती प्लास्टिकही (Plastic Eater Fungus) खाऊन पचवू शकते असे दिसून आले आहे. याबाबतची माहिती ‘प्लोस वन’ या नियतकालिकात देण्यात आली आहे.

संशोधकांनी म्हटले आहे की ही ‘व्हाईट-रोट फंगी’ (Plastic Eater Fungus) लिगनीनला तोडू शकते. हे एक जैविक पॉलिमर आहे जे लाकडाला मजबुती देत असते. विशिष्ट एन्झाईम्सचा वापर करून ही बुरशी असे लाकूडही पचवते. हे एन्झाईम्स म्हणजे प्रीटीन्स असतात जे पेशींमध्ये रासायनिक क्रिया घडण्यासाठी चालना देतात. श्रीलंकेतील केलानिया युनिव्हर्सिटीतील रेणुका अत्तानायके यांनी सांगितले की जर ही बुरशी कठीण अशा लाकडाला आणि विशेषतः लिगनिनला तोडू शकत असेल तर त्यांच्यामध्ये अन्य काही पॉलिमरना तोडण्याचेही ‘शस्त्र’ असू शकते. अशा पॉलिमर्समध्ये पॉलिइथेलिन किंवा प्लास्टिकचा समावेश होतो.

संशोधकांनी मध्य श्रीलंकेतील दिम्बुलागला ड्राय झोन फॉरेस्टमधील लाकूड नष्ट करणार्‍या बुरशीचे 50 नमुने गोळा केले. त्यांनी त्यापैकी काही नमुने कमी घनतेच्या पॉलिइथेलिनसह म्हणजेच प्लास्टिकसह ठेवले तर अन्य नमुने प्लास्टिक आणि लाकूड अशा दोन्हीसह ठेवले. 45 दिवसांनंतर आढळले की ही बुरशी सातत्याने प्लास्टिकऐवजी लाकडालाच प्राधान्य देते. मात्र, केवळ प्लास्टिकच जवळ असलेली बुरशी या पॉलिइथेलिनलाही तोडते असे दिसून आले. Plastic Eater Fungus

हे ही वाचा :

सहारा वाळवंटात मिळाली ‘बूमरँग’ झालेली उल्का!

प्लास्टिक द्या, सोने घ्या!

Paper Bag Day 2023 : प्लास्टिक बॅगला टाळून कागदी बॅग वापरूया..!

Back to top button