सहारा वाळवंटात मिळाली ‘बूमरँग’ झालेली उल्का! | पुढारी

सहारा वाळवंटात मिळाली ‘बूमरँग’ झालेली उल्का!

रबात : पृथ्वीवर आकाशातून अनेक उल्का कोसळत असतात. या उल्का अन्य ग्रह, उपग्रह किंवा लघुग्रहांचा एक तुकडा असू शकतात. अगदी मंगळावरून आलेलीही एक उल्का संशोधकांच्या अभ्यासात आहे. मात्र, पृथ्वीवरून अंतराळात गेलेला एखादा तुकडा पुन्हा पृथ्वीवरच जणू काही ‘बूमरँग’सारखी परत येण्याची घटना तशी दुर्मीळच म्हणावी लागेल. काही वर्षांपूर्वी मोरोक्कोमध्ये सहारा वाळवंटात एक उल्का सापडली होती. ती पृथ्वीचाच एक तुकडा असावी असे आता संशोधकांनी म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी सहारा वाळवंटात हा गडद लाल-करड्या रंगाचा दगड सापडला होता. एके काळी तो पृथ्वीवरूनच अंतराळात फेकला गेला होता आणि हजारो वर्षांनंतर तो पुन्हा एकदा पृथ्वीवर आला. या दगडाला पृथ्वीवर बूमरँग झालेली पहिली उल्का म्हटले जाऊ शकते. याबाबतच्या संशोधनाची माहिती गेल्याच आठवड्यात एका इंटरनॅशनल जियोकेमिस्ट्री कॉन्फरन्समध्ये सादर करण्यात आली. ती अद्याप कोणत्याही जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेली नाही.

जर्मनीतील गोएथे युनिव्हर्सिटी फँ्रकफर्टमधील भूवैज्ञानिक फ्रँक ब्रेनकर यांनी सांगितले की हा दगड म्हणजे एक उल्का आहे यामध्ये कोणताही संशय नाही. मात्र, ती पृथ्वीवरून अंतराळात जाऊन परत आलेली उल्काच आहे का हा वादाचा विषय होता. या दगडाची रासायनिक संरचना पृथ्वीवरील ज्वालामुखीय खडकांसारखीच आहे. या उल्केला ‘एनडब्ल्यूए 13188’ असे नाव देण्यात आले आहे. तिचे वजन आहे सुमारे 646 ग्रॅम. 2018 मध्ये मोरोक्कोच्या हद्दीत असलेल्या सहारा वाळवंटाच्या भागातील एका अज्ञात ठिकाणी ही उल्का सापडली होती. ही उल्का कोसळत असताना कुणीही पाहिले नव्हते.

संशोधकांना या उल्केत बेरिलियम-3, हेलियम-10 आणि नियॉन-21 सह आयसोटोपचे असे निशाणही आढळले आहेत जे दाखवतात की हा दगड ब्रह्मांडीय किरणांच्या संपर्कात होता. आयसोटोपच्या स्तरावरून असे दिसते की हा दगड कमीत कमी दहा हजार वर्षे अंतराळात होता. एखाद्या ज्वालामुखीच्या जोरदार उद्रेकामुळे हा दगड अंतराळात फेकला गेला असावा किंवा एखाद्या विशालकाय लघुग्रहाच्या धडकेने हा तुकडा अंतराळात उडाला असावा असे संशोधकांना वाटते. अर्थात दुसरी शक्यता अधिक तर्कसंगत आहे कारण दगड अंतराळात फेकला जाण्याइतका शक्तिशाली ज्वालामुखीच्या उद्रेकाची नोंद नाही.

Back to top button