प्लास्टिक द्या, सोने घ्या! | पुढारी

प्लास्टिक द्या, सोने घ्या!

श्रीनगर : प्लास्टिकच्या कचर्‍याची समस्या जगभर चिंतेचा विषय बनलेली आहे. प्लास्टिकचे माती किंवा पाण्यात नैसर्गिकरीत्या विघटन होत नसल्याने असा कचरा वर्षानुवर्षे साठून राहतो व पर्यावरणाला धोका निर्माण करतो. अशा कचर्‍यामुळे मानवासह सर्व सजीवांच्या आरोग्यालाही धोका असतो. त्यामुळे प्लास्टिकमुक्त पृथ्वीचे स्वप्न आता पाहिले जात आहे. आपल्या देशातच एक गाव असे आहे जिथे याबाबत मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. याठिकाणी प्लास्टिकचा कचरा दिल्याबद्दल चक्क सोने दिले जाते!

हे गाव दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आहे. त्याचे नाव आहे सदिवरा. येथील सरपंचांनी प्लास्टिकमुक्त करण्याचा मोठा उपक्रम सुरू केला. गावाचे सरपंच फारुख अहमद गणई यांना गाव प्लास्टिक प्रदूषणमुक्त करायचे आहे. व्यवसायाने वकील असलेल्या गणई यांनी त्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये फारसे यश मिळाले नाही. मग त्यांनी एक अनोखी घोषणा केली. ‘प्लास्टिक दो और सोना लो’ अशी ही घोषणा. त्यामुळे या उपक्रमात अर्थातच मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. या योजनेंतर्गत वीस क्विंटल प्लास्टिक कचरा दिल्यास पंचायत संबंधित व्यक्तीला सोन्याचे नाणे देईल अशी ही घोषणा होती. ही मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त झाले. हे पाहून आजूबाजूच्या गावांमध्येही असाच उपक्रम सुरू करण्यात आला.

संबंधित बातम्या
Back to top button