Ferrari Car : भारतात आली सव्वा सहा कोटींची वेगवान फेरारी | पुढारी

Ferrari Car : भारतात आली सव्वा सहा कोटींची वेगवान फेरारी

नवी दिल्ली : ‘फेरारी’ कारचे एक वेगळेच आकर्षण जगभरातील लोकांना असते. तिचे देखणे रूप व त्यापेक्षाही अधिक तिचा भन्नाट वेग लोकांना आकर्षित करीत असतो. आपल्या देशातही हॅचबॅक, एसयूव्ही यासह स्पोर्टस् कारचाही एक मोठा ग्राहकवर्ग आहे. मात्र, स्पोर्टस् कारच्या किमती जास्त असल्याने मध्यमर्गीयांसाठी त्या आवाक्याबाहेर असतात. विकत घेणे शक्य नसले तरी या गाड्यांची क्रेझ मात्र प्रचंड आहे. या यादीत सर्वात अव्वल स्थानी फेरारीचे आहे. आता फेरारीने भारतीय बाजारपेठेत आपली एक नवी कार लाँच केली आहे.

फेरारीचे अधिकृत इम्पोर्टर सेलेक्ट कार्सने ‘फेरारी 296 जीटीएस’ ही कार लाँच केली आहे. ही कार कन्व्हर्टिबल आणि नॉन कन्व्हर्टिबल या दोन रूपात सादर करण्यात आली आहे, सध्या या अत्यंत वेगवान कारची किंमत 6 कोटी 24 लाख रुपये (एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे आपला जबरदस्त लूक आणि पॉवरफूल इंजिनमुळे ही कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या कारमध्ये ग्राहकांच्या पसंतीस पडतील असे अनेक फिचर्स आहेत.

या कारमध्ये 3 लिटरच्या क्षमतेचे ‘व्ही 6’ टर्बोचार्ज इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 8000 आरपीएमवर 610 केडब्ल्यूची पॉवर आणि 6250 आरपीएमवर 740 एनएमचा टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 8-स्पीड एफ1 ड्युअल क्लच ट्रान्समिशन गेअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. या इंजिनचं आर्किटेक्चर अशाप्रकारे करण्यात आलं आहे की, ते त्याला अजून कॉम्पॅक्ट बनवते. ही एक हायब्रीड कार असल्याने यामध्ये 7.45 केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही रिअर-व्हील ड्राईव्ह प्लग-इन हायब्रीड आर्किटेक्चर असणारी ही पहिली ओपन-टॉप फेरारी आहे.

‘टीएमए’ एक्ट्यूएटरच्या माध्यमातून यामध्ये दोन वेगवेगळे पॉवर युनिटस् देण्यात आले आहेत, जे एकत्र किंवा फक्त इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्याची सुविधा देते. इतर फेरारीप्रमाणे यामध्येही कारचे इंजिन मागील बाजूस देण्यात आले आहे. कारमध्ये दोन सीट असून खास बाब म्हणजे, फ्रंट बोनटच्या आतमध्ये स्पेसिफिकेशन सीट देण्यात आली आहे. या कारमध्ये 65 लिटरचा फ्यूएल टँकही मिळतो. ही कार फक्त 2.9 सेकंदात 0 वरून थेट ताशी 100 कि.मी.चा वेग पकडण्यात सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या कारचे एक्सेलरेशन इतके पॉवरफूल आहे की, 0 ते ताशी 200 कि.मी.चा वेग पकडण्यासाठी फक्त 7.6 सेकंदाचा वेळ लागतो. या कारचा टॉप स्पीड ताशी 330 कि.मी. आहे.

हेही वाचा : 

Back to top button