राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; भाजप-शिंदे गटाच्या प्रत्येकी 7 जणांना संधी मिळणे शक्य | पुढारी

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; भाजप-शिंदे गटाच्या प्रत्येकी 7 जणांना संधी मिळणे शक्य

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, लवकरच भाजप-शिवसेनेच्या प्रत्येकी 7 नव्या चेहर्‍यांना या विस्तारात संधी दिली जाणार आहे. भाजप श्रेष्ठींनीदेखील या विस्ताराला हिरवा कंदील दाखवला असल्यामुळे येत्या आठवडाभरात विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांच्या एका प्रश्नावर महिनाअखेरपर्यंत हा विस्तार होईल, असे म्हटले आहे.

शरद पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याची शक्यता मावळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटला, तर त्याला मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी पुरेशा जागा असाव्यात म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यात आला होता. तथापि, आता मंत्रिमंडळ विस्तार करून भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सध्या मंत्रिमंडळात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रत्येकी दहा मंत्री आहेत. मंत्रिमंडळात आणखी 23 जागा रिक्त आहेत. मात्र, मंत्रिमंडळात भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी सहा ते सातजणांचा समावेश केला जाणार असल्याचे समजते. भाजप-शिवसेनेत मंत्रिमंडळात प्रत्येकी पन्नास टक्के जागावाटप ठरले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच जाहीर केले आहे. मात्र, भाजपला मंत्रिमंडळात जादा जागा हव्या असल्याने मंत्र्यांच्या संख्येवर चर्चा सुरू आहे.

चर्चेतील संभाव्य नावे

शिवसेना                           भाजप
भरत गोगावले                  संजय कुटे
अपक्ष बच्चू कडू              योगेश सागर
संजय रायमूलकर            माधुरी मिसाळ
योगेश कदम                 मेघना बोर्डीकर
अनिल बाबर                   किसन कथोरे
प्रताप सरनाईक            जयकुमार रावल
संजय शिरसाट             रणधीर सावरकर

Back to top button