मुंबई / पुणे : पुढारी वृत्तसेवा : मान्सून अद्याप बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे जात असून, तो लवकरच तामिळनाडूच्या दिशेने येत आहे. त्यामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक किनारपट्टीवर पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
२८ मेपर्यंत मान्सून कर्नाटकात व ३ ते ४ जूनच्या आसपास केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनामुळे संपूर्ण देशातील कमाल तापमानात घसरणीला सुरुवात झाली असून, आगामी पाच दिवसांत ४ ते ५ अंशांनी तापमान कमी होईल. तसेच देशातील बहुतांश राज्यांत वळवाचा पाऊस सुरू झाला आहे. विदर्भात २३ ते २६ मे रोजी हलक्या पावसाला सुरुवात होत आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात २३ रोजी एकच दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे मान्सूनमुळे देशातील वातावरण बदलून गेले आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने वाऱ्यांची चक्रीय स्थिती झाल्याने जम्मू-काश्मीरसह बर्फवृष्टी सुरू झाली आहे. तसेच उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.