बंगळूर, वृत्तसंस्था : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि बेंगलोर यांच्यातील सामन्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. विराट कोहलीच्या शतकानंतर गुजरातचा पराभव निश्चित मानला जात होता, मात्र शुभमन गिलने जी खेळी केली त्यामुळे विराट कोहलीचा आनंद फार काळ टिकला नाही. या सगळ्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहे. नेटकर्यांनी सोशल मीडियावरून आपला राग शुभमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ करत व्यक्त केला आहे. काहींनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन तिच्यावर भलतेसलते आरोप केले आहेत. आरसीबीच्या चाहत्यांना पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. तोंडाशी आलेला घास शुभमनने हिरावून घेतल्याने त्यांना अजूनही तो पराभव पचवता आलेला नाही. अशातच सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनी त्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
कित्येकांनी बेंगलोरच्या पराभवाला शुभमन गिलला जबाबदार धरले आहे. त्यात भरीस भर म्हणून अनेकांनी त्याच्या बहिणीला शाहनील गिलला अपशब्द वापरले आहेत. बर्याच जणांनी नेटकर्यांना असे करणे चुकीचे असून त्यात शुभमनचे शतक त्यात तिच्या बहिणीची काय चूक आहे, असा प्रश्न विचारत आपण खिलाडूवृत्तीचा स्वीकार करायला हवा. पराभव झाल्यानंतर तो अशा प्रकारे व्यक्त करणे चुकीचे आहे, असे म्हटले आहे.
अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या मीम्सबाबत राग व्यक्त केला आहे. हार-जीत हा खेळाचा भाग आहे, मात्र त्यामुळे कुणाच्या वैयक्तिक जीवनाबाबत अशाप्रकारे सामाजिक माध्यमातून प्रतिक्रिया देणे, शिवीगाळ करणे ही खिलाडूवृत्ती नक्कीच नाही. अशा प्रकारे काही जणांनी ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.