बायकोला डास चावला, नवरोबाची थेट पोलिसांकडे तक्रार! | पुढारी

बायकोला डास चावला, नवरोबाची थेट पोलिसांकडे तक्रार!

लखनौ : आपल्या प्रिय पत्नीला कोणताही त्रास होऊ नये म्हणून जपणारे अनेक नवरोबा असतात. आता अशाच एका तरुणाने लक्ष वेधून घेतले आहे. या तरुणाच्या पत्नीला डास चावल्यामुळे त्याने चक्क पोलिस ठाण्यात धाव घेतली. विशेष म्हणजे पोलिसांनीही याबाबत त्याला योग्य ती मदत केली!

उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. चंदौसीतील एका खासगी रुग्णालयात एका गर्भवती महिलेला दाखल करण्यात आले होते. तिची प्रसूती झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. मात्र, या रुग्णालयात अनेक डास होते व ते सतत महिलेला दंश करीत होते. त्यानंतर तिच्या नवर्‍याने थेट पोलिसांकडे डासांबाबत तक्रार केली. यूपी पोलिसांना टॅग करत त्याने एक ट्विट केले. ट्विटमध्ये त्याने म्हटले, माझ्या पत्नीने चंदौसी हरी प्रकाश नर्सिंग होमममध्ये एका छोट्या परीला जन्म दिला आहे. माझी पत्नी वेदनेने तडफडत आहे आणि त्यासोबत डास तिला खूप चावत आहेत. कृपया मला लगेच एक मॉर्टिन कॉईल द्या.

आता पोलिसांकडे डासांबाबतची तक्रार तुम्हाला अजब वाटेल. तुम्हाला हसू येईल आणि पोलिस यात काय करणार, काहीच नाही, असेही वाटेल! ही काय पोलिसांत तक्रार देण्यासारखी गोष्ट आहे का? असे तुम्ही म्हणाल; पण पोलिसांनी मात्र ही तक्रार गांभीर्याने घेतली. त्यांनी या व्यक्तीच्या ट्विटला रिप्लाय दिला. त्यांनी याबाबत योग्य कार्यवाही केली. यूपी पोलिसांनी ट्विट केले आहे, ज्यात म्हटले आहे. माफियापासून डासांपर्यंतचे निदान… नर्सिंग होमममध्ये आपल्या नवजात बाळाला आणि प्रसूती झालेल्या बायकोला डासांपासून आराम मिळावा म्हणून एका व्यक्तीने ट्विट करून मदत मागितली. यूपी पोलिसांनी त्वरित कार्यवाही केली आहे. नर्सिंग होमममध्ये मॉस्किटो क्वाईल पोहोचवले आहे. त्यानंतर या माणसाने पोलिसांचे आभार मानले.

हेही वाचा : 

 

Back to top button