Billionaires : जगभरातील अब्‍जाधीशांच्‍या संख्‍येत ८ टक्‍के घट, अदानी घसरले २३ व्‍या क्रमांकावर | पुढारी

Billionaires : जगभरातील अब्‍जाधीशांच्‍या संख्‍येत ८ टक्‍के घट, अदानी घसरले २३ व्‍या क्रमांकावर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगभरातील अब्‍जाधीशांच्‍या संख्‍येत ८ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मात्र भारतात १६ नवीन अब्‍जाधीशांची भर पडली आहे. ( Billionaires ) देशात शेअर बाजार गुंतवणूक सल्‍लागार राकेश झुनझुनवाला यांच्‍या कुटुंब या यादीत १६ व्‍या यादीत आहे. तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्‍या संपत्तीतही ६० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. गौतम अदानी यांना दर आठवड्याला तीन हजार कोटी रुपयांची फटका बसला आहे. त्‍यामुळे ते श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावरून २३ व्या क्रमांकावर घसरले आहेत, अशी माहिती ‘हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०२३’च्या अहवालात देण्‍यात आली आहे.

अदानी यांचे दर आठवड्याला ३००० कोटी रुपयांचे नुकसान

गेल्या १२ महिन्यांत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे दर आठवड्याला ३००० कोटी  रुपयांचे नुकसान झाले, असे ‘हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०२३’च्या अहवालात म्हटले आहे. अदानी यांना यांना हिंडेनबर्ग अहवालाचा मोठा आर्थिक फटका बसल्याचे त्यावरून स्पष्ट होते. कारण, २०२२ मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या स्थानावरून ते थेट २३ व्या स्थानावर घसरले आहेत.

‘ग्लोबल रिच लिस्ट २०२३ ‘चा अहवाल बुधवारी (दि.२२ ) प्रसिद्ध झाला आहे. अदानी यांच्या संपत्तीत वर्ष – दर वर्ष निकषांनुसार ३५ टक्क्यांची घसरण झाली. सध्या हा आकडा ५३ अब्ज डॉलर आहे. अदानी समूहाने आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत हे स्थान यात गमावले असून ती जागा चीनच्या झोंग शानशान यांनी घेतली आहे. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्गच्या अहवालानंतर, अदानी यांच्या संपत्तीला खऱ्या अर्थाने गळती लागली. एकेकाळी शिखरावर असलेल्या या अब्जाधीशाला आपली ६० टक्क्यांपेक्षा जास्त संपत्ती त्यात गमवावी लागली. अहवाल जाहीर होण्यापूर्वी ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते.

Billionaires : मुकेश अंबानी देशात सर्वात श्रीमंत

अदानी समूहाला झालेल्या २८ अब्ज डॉलर्सच्या निव्वळ तोट्यामुळे त्यांचे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे स्थान रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मिळाले. अंबानी यांची एकूण संपत्ती ८२ अब्ज डॉलर इतकी आहे. जगातील अव्वल १० अब्जाधीशांमध्ये अंबानी हे एकमेव भारतीय आहेत, असेही अहवालात दिसून आले आहे. ‘एमथ्रीएम हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०२३’ ही या यादीची बारावी आवृत्ती असून त्यात जगभरातील श्रीमंत व्यक्तींचे एक सर्वसमावेशक मानांकन आहे, ज्यांची एकूण संपत्ती किमान एक अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे, त्यांना यात स्थान दिले जाते.

जगभरात १७६ नवे अब्‍जाधीश

‘हरुन ग्‍लोबल’ने जाहीर केलेल्‍या श्रीमंताच्‍या यादीच्‍या अहवालातील माहितीनूसार, यावर्षी जगभरात ९९ शहरांमध्‍ये १८ उद्योगांमध्‍ये १७६ नवीन अब्‍जाधीशांची भर पडली आहे. मागील वर्षी म्‍हणजे २०२२ मध्‍ये जगात एकूण ३ हजार ३८४ अब्‍जाधीश होते. यामध्‍ये यावर्षीच्‍या पहिल्‍या दोन महिन्‍यामध्‍येच घट झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. या वर्षी जगातील अब्‍जाधीशांची संख्‍या ३ हजार ११२ वर आली आहे. हे सर्व अब्‍जाधीश ६९ देशांमधील असून त्‍यांचा २ हजार ३५६ कंपन्‍यावर ताबा आहे.

Billionaires : देशातील श्रीमंतांच्‍या संपत्तीत ३६० अब्‍ज डॉलरची वाढ

देशातील श्रीमंताच्‍या संपत्तीतही भरीव वाढ झाल्‍याचे ‘हरुन ग्‍लोबल’ने जाहीर केलेल्‍या अहवालात म्‍हटले आहे. भारतात मागील पाच वर्षांमध्‍ये श्रीमंतांच्‍या संपत्तीत ३६० अब्‍ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ हाँगकाँग शहराच्‍या जीडीपीएवढी आहे.

ॲमेझॉनच्‍या जेफ बेझोस यांना सर्वाधिक फटका

ॲमेझॉनचे संस्‍थापक जेफ बेझोस यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्‍यांचे 118 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या अब्जाधीशांमध्ये ते अव्वल स्थानावर आहेत.नुकसानीच्‍या यादीत ५३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अदानी सहाव्या तर अंबानी ८२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सातव्या स्थानावर आहेत.टेस्लाचे एलोन मस्क यांचे 48 अब्ज डॉलर , सर्गे ब्रिन यांनी ४४ अब्ज आणि लॅरी पेज ४१ अब्‍ज गमावले आहेत. डीमार्टचे मालक आरके दमानी यांच्या मालमत्तेत ३० टक्‍के घट झाली आहे. ते टॉप १०० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

आकडेवारी सांगते…
  • भारतात 187 अब्जाधीश राहतात, तर एकूण 217 भारतीय वंशाचे अब्जाधीश आहेत.
  • जागतिक श्रीमंतांच्या यादीत मुंबई, बंगळुरू आणि नवी दिल्ली अव्वल २५ मध्ये
  • 69 नवीन अब्जाधीशांसह चीन पहिल्या क्रमांकावर आहे
  • 26 नवीन अब्जाधीशांसह अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे

हेही वाचा : 

 

 

Back to top button