या सीईओचा नादच खुळा; तरुण दिसण्यासाठी दरवर्षी १६ काेटी खर्च, २ डझन सप्लिमेंट्सह ग्रीन ज्युसने दिवसाची सुरूवात | पुढारी

या सीईओचा नादच खुळा; तरुण दिसण्यासाठी दरवर्षी १६ काेटी खर्च, २ डझन सप्लिमेंट्सह ग्रीन ज्युसने दिवसाची सुरूवात

वॉशिंग्टन : तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करणारे अनेकजण आपण पाहिले असतील. मात्र, अमेरिकेतील एका कंपनीच्या सीईओने वय 5.1 वर्षांनी कमी दिसण्यासाठी एका ब्ल्यू प्रिंटवर काम सुरू केले आहे. त्याने तरुण दिसण्यासाठी दरवर्षी 16 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. त्याच्याकडे 30 पेक्षा जास्त डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांचा ताफा दिमतीला आहे.

खरे सांगायचे तर अनेकांना असे वाटते की, आपण कधीच म्हातारे होऊ नये. त्यामुळे यातील काही जण तरुण दिसण्यासाठी कॉस्मेटीक सर्जरीचा महागडा पर्याय निवडतात. मात्र, 45 वर्षांचा सीईओ 18 वर्षांएवढा दिसण्याच्या ध्येयाने जणू झपाटला आहे. त्याने हे लक्ष्य गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्याने जी महागडी ट्रीटमेंट सुरू केली आहे तिचा खर्च आहे प्रतिवर्ष 20 लाख डॉलर्स. त्याचा आहारसुद्धा निश्चित करण्यात आला आहे. या वल्लीचे नाव आहे ब्रायन जॉन्सन.

आपण 18 वर्षीय व्यक्तीची फुप्फुसाची क्षमता आणि शारीरिक सहनशक्ती मिळवल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच 37 वर्षीय व्यक्तीचे हृदय आणि 28 वर्षांच्या व्यक्तीची त्वचा त्याने धारण केली आहे. जॉन्सन हा अमेरिकेतील एक अल्ट्रावेल्थ सॉफ्टवेअर उद्योजक आहेत. 30 पेक्षा जास्त डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांचा ताफा त्याच्या दिमतीला आहे. ही टीम त्याच्या शरीरकार्याचे निरीक्षण करते. 29 वर्षीय डॉक्टर ऑलिव्हर झोलमन यांच्या नेतृत्वाखालील या टीमने जॉन्सनच्या सर्व अवयवांमधील वृद्धत्वाची प्रक्रिया उलट करण्याचा निर्धार केला आहे.

कारण, जॉन्सनला 18 वर्षांच्या मुलासारखे शरीर हवे आहे. प्रोजेक्ट ब्लू प्रिंटअंतर्गत जॉन्सन रोज काटेकोरपणे दिनचर्या पाळतो आणि प्रामुख्याने शाकाहारी आहार घेतो. त्याच्या आहारातील दैनिक उष्मांकांचे प्रमाण आहे 1,977. एक तास व्यायाम आणि रोज रात्री ठरलेल्या वेळी झोप हे नियम तो प्रकर्षाने पाळतो. त्याची सकाळ पहाटे 5 वाजता होते. दोन डझन सप्लिमेंट्स, क्रिएटिन आणि कोलेजन पेप्टाइड्ससह ग्रीन ज्युसने त्याचा दिवस सुरू होतो. डॉ. झोलमन आणि जॉन्सन दीर्घायुष्यावरील सर्व वैज्ञानिक पुस्तके वाचून काढत आहेत. या प्रोजेक्टसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीची गरज आहे. यात कॅलिफोर्नियातील व्हेनिस येथे जॉन्सनच्या घरातील वैद्यकीय सूटच्या खर्चाचाही समावेश आहे. यावर्षी जॉन्सन स्वतःच्या शरीरावर किमान 20 लाख डॉलर खर्च करण्याच्या तयारीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button