..तर अमित शहा यांनी जम्मू ते श्रीनगर पदयात्रा करून दाखवावी : राहुल गांधी | पुढारी

..तर अमित शहा यांनी जम्मू ते श्रीनगर पदयात्रा करून दाखवावी : राहुल गांधी

श्रीनगर; वृत्तसंस्था :  काश्मीरमध्ये निरपराधांच्या हत्या आणि बॉम्बस्फोट नित्याचे झाले असतानाही सारे काही आलबेल आहे, असे सांगितले जाते. सगळे व्यवस्थित असेल तर गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू ते श्रीनगर अशी पदयात्रा करून दाखवावी, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले.

भारत जोडो यात्रेच्या समारोपानंतर श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना गांधी यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, काश्मिरातील परिस्थिती सांगितली जाते तशी नाही. सारे काही आलबेल आहे, असे भाजपचे नेते सांगत असतात. मग ते जम्मू ते श्रीनगर अशी पदयात्रा का करत नाहीत, असा सवाल करतानाच गांधी यांनी सारे काही व्यवस्थित आणि सुरळीत असेल तर गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू ते श्रीनगर अशी पदयात्रा करून दाखवावी, असे आव्हान दिले. दोनच दिवसांपूर्वी सुरक्षा व्यवस्थेत गोंधळ झाल्याने राहुल गांधी यांना पदयात्रा मध्येच थांबवावी लागली होती.

रविवारी श्रीनगरच्या लाल चौकात काँग्रेस नेते राहुल गांधी भारतीय तिरंगा फडकावला. सुरक्षा रक्षकांच्या गाडीतून राहुल गांधी लाल चौकात आले. यानंतर यात्रेच्या एक दिवस अगोदरच भारत जोडो यात्रा रविवारी सांगता झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाल चौकातील कार्यक्रमादरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा उपस्थित होत्या. काँग्रेस कार्यालयात होणारा कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. लाल चौकात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, उमर अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती उपस्थित होते.

राहुल गांधी ट्रोल

राहुल गांधी यांनी लाल चौकात तिरंगा फडकवल्यानंतर एशियन न्यूज इंटरनॅशनलने त्याचा फोटो आणि व्हिडीओ टि्वटरवर शेअर केला. या टि्वटवर नकारात्मक कमेंटस् पाहायला मिळत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ही चांगली गोष्ट आहे. पण राहुल गांधी यांचे फ्लेक्स राष्ट्रध्वजापेक्षा मोठे का आहे? झेंड्यापेक्षा मोठा तपस्वी, अशी दुसर्‍या एका युजरने कमेंट केली आहे.

Back to top button