ऊसतोड कामगारांच्या मुलांकडे होतेय दुर्लक्ष, मुलांवर संकट | पुढारी

ऊसतोड कामगारांच्या मुलांकडे होतेय दुर्लक्ष, मुलांवर संकट

पारगाव; पुढारी वृत्तसेवा; ऊसतोड जोरात सुरू असल्याने बिबट्यांचा अधिवास संपत चालला आहे, त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बिबटे सैरभैर झाले आहेत. ऊसतोड कामगारांचे ऊसतोडणी करताना त्यांच्या लहान मुलांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ऊस तोडणीची कामे वेगात सुरू आहेत. हा परिसर बिबटप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या परिसरात सर्वाधिक बिबटे आहेत. आता ऊसतोडीची कामे वेगात सुरू असल्याने बिबट्यांना लपण जागा राहिल्या नाहीत.

ऊसतोड कामगार, शेतकर्‍यांना सर्रास बिबट्यांचे दर्शन होऊ लागले आहे. ऊसतोडणीला सुरुवात केल्यानंतर बिबट्यांच्या गुरगुरण्याचा आवाज येत असल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. ऊसतोडणीचे काम सुरू असताना ऊसतोड कामगारांची लहान मुलेही अडचणींच्या ठिकाणी, उसाच्या शेताच्या बांधावरच खेळत असतात. बहुतांश उसाची शेती ही रस्त्यांच्या कडेलाच असतात. त्यावरून वाहने अतिशय भरधाव वेगाने ये-जा करत असतात. लहान मुले रस्त्यांच्या कडेलाच खेळत असतात, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

साखरशाळांमध्ये मुले घालण्याबाबत अनास्था
ऊसतोड कामगार ऊसतोड करताना त्यांच्या लहान मुलांची काळजी घेताना दिसत नाहीत. या भागात बिबट्यांची भीती आहेच, परंतु मोठे सर्पही मोठ्या प्रमाणावर या परिसरात आहेत. त्यामुळे या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लहान मुलांसाठी साखर कारखानास्थळांवर साखरशाळाही आहेत, परंतु त्यामध्ये बोटावर मोजण्याइतकीच मुले असतात. इतर लहान मुले मात्र आई-वडिलांबरोबर ऊसतोडणीवेळी सोबतच दिसतात. त्यांनाही शाळांमध्ये घालणे गरजेचे आहे.

Back to top button