Space Mission: अ‍ॅमेझॉनचे संस्थापक बेझोस यांची प्रेयसी करणार अंतराळ मोहिमेचे नेतृत्व | पुढारी

Space Mission: अ‍ॅमेझॉनचे संस्थापक बेझोस यांची प्रेयसी करणार अंतराळ मोहिमेचे नेतृत्व

वॉशिंग्टन : ‘ब्लू ओरिजिन’ ही अंतराळ कंपनी आणि ‘अमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस हे त्यांची प्रेयसी लॉरेन शॅन्शेझला अवकाश मोहिमेवर (Space Mission) पाठवणार आहे. बेझोस यांची खासगी अंतराळ कंपनी ‘ब्लू ओरिजिन’ पुढील वर्षी आपल्या पहिल्या महिला क्रूला अंतराळात पाठवणार आहेत. बेझोस यांच्या प्रेयसी लॉरेन शॅन्शेझ या मोहिमेचे नेतृत्व करतील.

बेझोस यांची प्रेयसी लॉरेन शॅन्शेझ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्या 2024 च्या सुरुवातीला मोहिमेचे नेतृत्व करतील. अंतराळात जाण्याबद्दल त्या खूप उत्साही तसेच थोड्या चिंतितही आहेत. शॅन्शेझ या अमेरिकेतील एक माध्यमकर्मी आणि न्यूज अँकर म्हणून ओळखल्या जातात. याशिवाय त्या परवानाधारक हेलिकॉप्टर पायलटही आहेत. तथापि, शॅन्शेझ यांना अंतराळ प्रवासाचा (Space Mission) कसलाही अनुभव नाही. त्या ब्लॅक ऑप्स एव्हिएशनच्या संस्थापक आहेत.

Space Mission: इतर 5 महिलांचाही मोहिमेत सहभाग

बेझोस हे वैमानिक परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यांच्यासोबत मोहिमेत सहभागी होणार्‍या इतर 5 महिलांची ओळख प्रक्षेपण जवळ येईपर्यंत उघड केली जाणार नाही. याची कंपनीकडून अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. दरम्यान, अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस ब्लू ओरिजिनच्या 20 जुलै 2021 रोजीच्या अंतराळ मोहिमेत सहभागी झाले होते.

बेझोस यांनी शॅन्शेझ यांच्यासोबतच्या नात्यानंतर 2019 मध्ये आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. ब्लू ओरिजिनचे ध्येय सामान्य नागरिकांना अंतराळात पाठवण्याचे आहे. बेझोस यांना व्यावसायिक अंतराळ युगाचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे. ब्लू ओरिजिनने आपल्या तिकिटांच्या किमतीचा खुलासा केलेला नाही. मात्र, एका बोली लावणार्‍याने 2021 मध्ये पहिल्या उड्डाणात एका जागेसाठी 28 मिलियन डॉलरची रक्कम (Space Mission) दिली होती. ब्लू ओरिजिनकडे सध्या दोन लाँच वाहने आहेत. यात न्यू शेपर्डचाही समावेश आहे. ज्याचे नाव अंतराळातील पहिले अमेरिकन अ‍ॅलन शेपर्ड यांच्या नावावरून देण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button