Hotel advertisement : 1907 मधील 'या' हॉटेलची जाहिरात..आमच्याकडे आहे इलेक्ट्रिक लाईट व फॅन! | पुढारी

Hotel advertisement : 1907 मधील 'या' हॉटेलची जाहिरात..आमच्याकडे आहे इलेक्ट्रिक लाईट व फॅन!

मुंबई : महानगरी मुंबईतील सर्वात जुन्या हॉटेल्सपैकी (Hotel advertisement) एक म्हणजे ताजमहाल हॉटेल. या हॉटेलचे 1 डिसेंबर 1903 मध्ये उद्घाटन झाले होते. हॉटेलची एक जाहिरात 1907 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. इतक्या वर्षांनंतर आता ही जाहिरात आपल्याला अतिशय अनोखी वाटू शकते. याचे कारण म्हणजे या जाहिरातीत म्हटले आहे की आमच्या हॉटेलमध्ये इलेक्ट्रिक लिफ्ट, इलेक्ट्रिक लाईट व इलेक्ट्रिक फॅन आहेत. त्या काळात विजेचे दिवे आणि पंखे म्हणजे ‘लक्झरी’ होती! त्या काळात तेथील एका डबल रूमचे दिवसाचे भाडे सहा रुपये होते. त्यावेळी लोकांचा महिन्याचा सरासरी पगारच पाच रुपये असायचा!

या जाहिरातीच्या वरील भागात आधी ‘बॉम्बे’ असे लिहिलेले आहे आणि त्याच्या खाली ‘ताज महाल पॅलेस हॉटेल’ (Hotel advertisement) असे ठळक अक्षरात लिहिले आहे. त्या खाली हॉटेलचे छायाचित्रही असून त्याच्या शेजारी ‘द न्यूएस्ट, लार्जेस्ट अँड बेस्ट अपॉईंटेड हॉटेल इन द ईस्ट’ (पूर्वेकडील सर्वात नवीन, भव्य आणि सर्वोत्तम हॉटेल) असे वाक्य आहे.

या हॉटेलमध्ये सुसज्ज अशा 400 खोल्या आणि सुटस् असल्याचेही नमूद केलेले आहे. हॉटेलमध्ये (Hotel advertisement) भव्य अशी डायनिंग रूम, जनरल आणि लेडीज ड्रॉईंग रूमही असल्याचे म्हटले आहे. सर्व काही कलात्मकरीत्या सजवलेले असल्याचे आवर्जून नमूद केलेले आहे. त्यामधील एक ठळक अक्षरातील ओळीत लिहिले आहे की ‘तीन इलेक्ट्रिक लिफ्टस्, इलेक्ट्रिक लाईट आणि इलेक्ट्रिक फॅन्स हॉटेलमध्ये आहेत’.

सध्याच्या काळात विजेचे दिवे किंवा पंखे ही एक सर्वसामान्य बाब बनलेली आहे. मात्र, 115 वर्षांपूर्वीच्या काळात हे केवळ अशा पंचतारांकित हॉटेलमध्येच (Hotel advertisement) पाहायला मिळायचे आणि ते प्रतिष्ठेेचे चिन्ह असायचे. ग्राहकांना हॉटेलपर्यंत आणण्यासाठी मोटर बोट आणि मोटारींचीही सोय असल्याचे यामध्ये म्हटले आहे. हॉटेलमध्ये कायमस्वरूपी ऑर्केस्ट्राही असल्याचे सांगून तेथील मनोरंजनाच्या सोयीचीही माहिती या जाहिरातीत दिलेली आहे.

हेही वाचा : 

Back to top button