Orion spacecraft : ‘ओरियन’ यान परतले पृथ्वीवर | पुढारी

Orion spacecraft : ‘ओरियन’ यान परतले पृथ्वीवर

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ची ’आर्टेमिस-1’ चंद्रमोहीम पूर्ण झाली. रविवारी रात्री 11.10 वाजता ओरियन अंतराळयान (Orion spacecraft)1.4 दशलक्ष मैलांचा प्रवास करून पृथ्वीवर परतले. त्याचे लँडिंग मेक्सिकोच्या ग्वाडालुप बेटाजवळ प्रशांत महासागरात झाले. ‘नासा’ने 25 दिवसांपूर्वी 15 नोव्हेंबरला तिसर्‍या प्रयत्नात ही मोहीम सुरू केली होती.

‘ओरियन’चा पृथ्वीवरचा प्रवेश विशेष ठरला आहे. ‘स्किप एंट्री’ तंत्राचा अवलंब करून ते प्रथमच पृथ्वीवर उतरले. या प्रक्रियेत तीन टप्पे होते. ‘ओरियन’ (Orion spacecraft)ने प्रथम पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या भागात प्रवेश केला. यानंतर ते आत असलेल्या कॅप्सूलच्या मदतीने वातावरणाच्या बाहेर आले. अखेरीस, ते पॅराशूटद्वारे वातावरणात परत आले. स्किप एंट्री दरम्यान, स्पेसक्राफ्टचे क्रू मॉड्यूल आणि सर्व्हिस मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे झाले.

सर्व्हिस मॉड्यूल आगीत अडकले तर क्रू मॉड्यूल पॅराशूटच्या साहाय्याने त्याच्या निश्चित जागेवर उतरले. वातावरणात पुन्हा प्रवेश केल्याने त्याची गती लक्षणीयरीत्या कमी झाली. ‘आर्टेमिस-1’ मिशन एक चाचणी उड्डाण आहे. नासा ‘आर्टेमिस-2’ मिशनमध्ये अंतराळवीर पाठवण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञ ‘ओरियन’ (Orion spacecraft)च्या पृथ्वीवर उतरण्यावर बारीक लक्ष ठेवून होते. याशिवाय ‘स्किप एंट्री’ हे ‘नासा’चे अत्याधुनिक तंत्रज्ञान असून ‘ओरियन’ हा त्याचा पहिलाच प्रयत्न होता.

Back to top button