अरूणाचलमध्ये घुसखोरी सुरू असताना सत्ताधारी राजकारणात मश्गुल : संजय राऊतांचा घणाघात | पुढारी

अरूणाचलमध्ये घुसखोरी सुरू असताना सत्ताधारी राजकारणात मश्गुल : संजय राऊतांचा घणाघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातच्या निवडणुकांचा जल्लोष सुरू असताना चीनचे सैन्य तवांगमध्ये घुसत होते. देशाच्या सीमा उघड्या पडल्या आहेत. देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचे राजकारण केले आहे. सत्ताधाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून देशाच्या सीमांकडे लक्ष द्यावे. चीनची अरूणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी सुरू असताना केंद्र सरकार मात्र राजकारणात मश्गुल आहे, असा घणाघात शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

चीनने अरूणाचलवर ताबा सांगितला असताना सरकार गंभीर नाही. देशातील विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत चीन शांत होता. त्यांना शांत राहायला सांगितलं होत का? लडाखमधून चिनी सैन्य बाहेर काढले, त्यानंतर चर्चा झाली आता तवांगमध्ये घुसले आहेत. देशाच्या राज्यकर्त्यांनी थोडं राजकारणातील लक्ष कमी करावे. विधानसभा, विरोधी पक्ष, केंद्रीय तपास यंत्रणा यावर लक्ष देण्यापेक्षा देशाच्या सीमा ज्या असुरक्षित झाल्या आहेत, चीन सारखा शत्रू तिन्ही बाजूंनी घुसत आहे, त्याकडे लक्ष दिलं तर खरी देशसेवा होईल. आज विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न लावून धरणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.

सरकार राजकारणात गुंतल्याने चीन, पाकिस्तान व इतर सीमेवरील दुष्मन देश धडका मारत आहेत. सरकार गांभीर्याने घेत नाही. पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपविण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. हे तवांगच्या घटनेवरून दिसत आहे. आपले जखमी सैनिक उपचार घेत आहेत. पण सत्य काय आहे हे समजत नाही. किती सैनिक जखमी झाले? कीती शहीद झाले? याची माहिती सरकार देत नाही. जे गलवानमध्ये झाले तेच तवांगच्या बाबतीत होत आहे. गुजरातच्या निवडणुकांचा जल्लोष सुरू असताना चीनचे सैन्य तवांगमध्ये घुसत होते. देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचे राजकारण केले आहे, अशी टीका राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

दरम्यान, सीमाप्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री रस्त्यांवर भेटले असं समजत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर सातत्याने हल्ला करत असताना तुम्ही त्यांना सहज चालता-चालता चर्चा करता आणि चर्चा झाली म्हणून सांगता, हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button