‘व्हॉटस् अ‍ॅप’ने आणले नवे ‘ग्लोबल व्हॉईस प्लेअर फिचर’, काय आहे खास त्यात? | पुढारी

‘व्हॉटस् अ‍ॅप’ने आणले नवे ‘ग्लोबल व्हॉईस प्लेअर फिचर’, काय आहे खास त्यात?

न्यूयॉर्क : अलीकडच्या काळात व्हॉटस् अ‍ॅपने अनेक फिचर्स लाँच केली आहेत. आता या अ‍ॅपने पुढचे पाऊल टाकत एक नवे फिचर युजर्ससाठी आणले आहे. ‘ग्लोबल व्हॉईस प्लेअर फिचर’ असे याचे नाव असून मागील बीटा अपडेटमध्ये हे फिचर दिसून आले आहे. तसेच व्हॉटस् अ‍ॅप डेस्कटॉपवरही याचे टेस्टिंग करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, काही अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी ते उपलब्धही करून देण्यात आले आहे.

हे फिचर युजर्सना विशेष फायदेशीर ठरणार आहे. एखाद्यावेळी आपल्या व्हॉटस् अ‍ॅपवर मोठी व्हॉईस नोट येते. ही व्हॉईस नोट ऐकत तुम्हाला अन्य मेसेजही वाचायचे असतात. मात्र, या दोन्ही गोष्टी करणे काहीसे अशक्य होते. युजर्सची ही अडचण व्हॉटस् अ‍ॅप दूर करणार आहे. हे अ‍ॅप आता ग्लोबल व्हॉईस प्लेअर फिचर लाँच करीत असून यामुळे युजर्सना व्हॉईस नोट ऐकणे सुलभ होणार आहे. ‘आयओएस’ बीटा टेस्टरने या फिचरचा अनुभव यापूर्वी घेतला आहे.

आयओएस बीटा टेस्टर्ससाठी हे फिचर यापूर्वीच रोल आऊट करण्यात आले आहे. ग्लोबल व्हॉईस प्लेअर अँड्रॉईड बीटा टेस्टर्ससाठी रोल आऊट केले जाणार आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्स वेगवेगळ्या चॅटस्वर मेसेज करणे आणि व्हॉईस नोट ऐकणे या दोन्ही गोष्टी एकाचवेळी करू शकणार आहेत. कितीही मोठी व्हॉईस नोट असली, तरी आता युजरला दुसर्‍या चॅटवरील मेसेजला उत्तर देताना व्हॉईस नोट ऐकता येणार आहे.

सध्या या अ‍ॅपवर कोणत्याही स्वरूपाची व्हॉईस नोट ऐकत असताना युजर त्या चॅटमधून बाहेर पडला की, व्हॉईस नोट बंद होते. ही नोट पुन्हा ऐकण्यासाठी त्याला त्यावर परत जावे लागते. आता मात्र नव्या फिचरमुळे हा त्रास वाचणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button