मेंढीपालन करा भरघोस उत्पन्न मिळवा | पुढारी

मेंढीपालन करा भरघोस उत्पन्न मिळवा

सर्वसाधारण मेंढपाळाला मेंढी व्यवसायापासून मिळणार्‍या उत्पादनापैकी मांस, लोकर व खताच्या विक्रीतून आर्थिक उत्पादन मिळते. मेंढीपालन व्यावसायिकांची श्रद्धा पारंपरिक मेंढीपालनावर असल्याने ते कोणतेही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत नाहीत. त्यामुळे अनुवांशिक गुणवत्ता असूनही मेंढ्यांपासून त्यांना मिळणारे उत्पन्न खूपच कमी मिळते. त्या अनुषंगाने स्थानिक जातीमध्येच सुधारणा घडवून सुधारित पद्धतीने मेंढीपालन कसे करता येईल यावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत सर्वसमावेशक मेंढी सुधार प्रकल्पात संशोधन चालू आहे.

महाराष्ट्रात दख्खनी जातीच्या मेंढ्या आढळतात. या मेंढ्या मुख्यत्वे मांसासाठी पाळल्या जातात. मेंढपाळ आपले हे पशुधन नैसर्गिक चराई क्षेत्रावरच पोसत असून हा धंदा व्यवस्थापनाच्या द़ृष्टीने अतिशय प्राथमिक अवस्थेत आहे. आपल्या मेंढ्या घेऊन चार्‍याच्या शोधात अवर्षणप्रवण क्षेत्राकडून जास्त पावसाच्या क्षेत्राकडे 7 ते 8 महिने मेंढपाळ भटकंती करत असतात.

फक्त पावसाळ्यात 3 ते 4 महिने परत आपल्या गावी येतात. सततच्या भटकंतीमळे शैक्षणिक मागासलेपणा तसेच मेंढीच्या नवीन जाती, व्यवस्थापन व रोगांविषयी अज्ञान व अनास्था मेंढपाळांमध्ये दिसून येते. किफायतशीर मेंढीपालनामध्ये पैदास व संगोपन या 2 गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्यासाठी मेंढपाळांनी खालील सूचनांचा कटाक्षाने विचार करून त्या अमलात आणल्यास त्यांच्याकडील मेंढ्यांपासून जास्त उत्पादन देणार्‍या मेंढ्या तयार करता येतील व हा धंदा अधिक किफायतशीरपणे करता येईल.

मेंढ्यांचे प्रजनन मोसमी असते. मोसमाच्या सुरुवातीच्या दिवसांत जावळी (मेंढा) सोडल्यास मेंढ्या माजावर येण्यास मदत होते. त्यावेळी 2 आठवडे आधी मेंढ्यांना खुराक सुरू केल्यास त्या लवकर माजावर येतात. याला इंग्रजीत ‘फ्लशिंग’ असे म्हणतात. यासाठी 200 ते 250 ग्रॅम मका, बाजरी किंवा ज्वारी यापैकी कोणतेही एक धान्य खुराक म्हणून द्यावे. प्रजननासाठी वापरल्या जाणार्‍या नर मेंढ्यास (जावळी) रोज 200 ते 300 ग्रॅम भरडा द्यावा व त्या काळात मोड आलेली मटकी 100 ते 120 ग्रॅम दररोज द्यावी. त्यामुळे पैदाशीचा जोम व वीर्याची गुणवत्ता टिकविली जाते.

एक मेंढा एका कळपात 2 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवू नये. तो ताबडतोब बदलावा. त्यामुळे अंतःप्रजननामुळे (निकटचा संबंध) कळपात दोष उत्पन्न होण्याचा धोका असतो. त्यासाठी जावळी बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गाभण मेंढ्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष करू नये. गाभण काळात 3 महिन्यांपासून मेंढ्यांना 200 ते 250 गॅ्रम भरडा गर्भरोपणासाठी देणे जरुरीचे आहे. कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडिन, तांबे, कोबाल्ट या खनिज द्रव्यांची जरूरी असते. या खनिजांनी युक्त अशा विटा (चाटण्याच्या क्षार विटा) बाजारात मिळतात. त्या वाडग्यात (गोठ्यात) बांधाव्यात.

मेंढी व्यायल्यानंतर मेंढीला कोकरू चाटू द्यावे. त्यामुळे मेंढीचा मातृभाव वाढविण्यास उपयोगी पडते. कोकरू 1 ते 2 तासांत उठून मेंढीला पिऊ लागते. कोकराला चीक पाजणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे कोकराला आईपासून रोगप्रतिकारकशक्ती मिळते व पोटातील घाण बाहेर पडून कोकरू ताजेतवाने दिसते. मांसोत्पादनासाठी पाळलेल्या कोकरांना मेंढीला पिणे बंद झाल्यापासून भरडा सुरू करावा. त्यामध्ये धान्य 20 भाग, गव्हाचा भुसा 7 भाग, पेंड 20 भाग, मीठ 1 भाग व खनिज व जीवनसत्त्व मिश्रण 2 भाग असे प्रमाण असावे. असा भरडा 100 ग्रॅम ते 300 ग्रॅम वय/वजनाप्रमाणे देण्यात यावा.

उन्हाळ्याच्या दिवसांत मेंढ्यांना चराऊ रानात व शेतात चरण्यासाठी काहीच मिळत नाही. अशावेळी बाभूळ, शमी, सौंदड यांच्या शेंगा, सुबाभूळ, अंजन, कडुलिंब, वड, पिंपळ इत्यादी झाडांचा डहाळा करावा. तसेच अतिरिक्त खुराक द्यावा, जेणेकरून उन्हाळ्याचा ताण सहन करणे सुलभ होईल व मेंढ्या अशक्त होणार नाहीत.

Back to top button