

पुढारी ऑनलाईन डेस्क : वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील जवानाचा झाशी (उत्तर प्रदेश) येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. दीपक दिनकर गायकवाड (वय ३४) असे त्यांचे नाव आहे. अधिक माहिती अशी की दीपक गायकवाड हे भारतीय सैन्य दलात २००४ साली भरती झाले होते. भरतीनंतरचे ट्रेनिंग नाशिकमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी आसाम ,जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी ठिकाणी सेवा बजावली होती.
सध्या ते झाशी (उत्तरप्रदेश) येथे सेवेत होते. ११ जुलै रोजी गावातून दीपक आपल्या कुटुंबासोबत झाशी येथे गेले होते. बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान त्यांना घरी अचानक चक्कर आल्याने जमिनीवर पडले. त्यावेळी त्यांच्या पत्नी पूजा यांनी शेजाऱ्यांना बोलवून दीपक यांना तत्काळ आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले; पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेचे डॉक्टरांनी सांगितले.
दीपक यांचे वडील भारतीय सैन्य दलात होते. दीपक यांचे शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत वडरगे गावातील विद्यामंदिर शाळेत तर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण विवेकानंद हायस्कूल गडहिंग्लज येथे झाले. बारावीनंतर ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन बहिणी असा परिवार आहे.
हेही वाचा :