सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
सप्तशृंगगड हे महाराष्ट्राचे अर्धशक्तिपीठ असल्याने भाविक भक्तांची नेहमी वर्दळ चालू असते. तसेच गडावर नवरात्रोत्सव चालू असून, या वेळेस कळवण एसटी आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे अक्षरशः लहान मुले, वृद्ध व्यक्ती व भाविकांचे खूप हाल झाल्याने रात्री आणि दिवसा उन्हात पाच किलोमीटरची पायपीट करावी लागली. कळवण आगाराच्या कुचकामी नियोजनामुळे भाविकांबरोबरच व्यापार्यांना मोठा फटका बसला.
भाविकांच्या रोषाला सामोरे जाणे सोडून शासकीय अधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकारी पळून गेल्याने भाविकांच्या मोठ्या रोषाला बसचालकांना सामोरे जावे लागले. सप्तशृंगगडावर व्हीआयपी, इतर खासगी वाहनांना प्रशासनाकडून पास घेऊन गडावर जाण्याची परवानगी आहे. परंतु असे असताना पायथ्याच्या कमानीतून पोलिसांदेखत खासगी गाड्या विनापास मोठ्या संख्येने गडावर जात होत्या.
एसटी महामंडळाच्या मुजोर कारभाराचा प्रत्यय भाविकांना ऐन गर्दीत आला. सातव्या माळेला गर्दीचे प्रमाण अधिक असते, असे असूनही एसटीच्या विविध आगारांकडून गडावर तात्पुरत्या स्वरूपात जादा गाड्या सोडण्याचे नियोजन विभाग नियंत्रकांना करता आले नाही. त्यामुळे अपुर्या गाड्यांच्या माध्यमातून भाविकांची वाहतूक सेवक करत होते. याच ताण-तणावातून खासगी वाहनाला धक्का लागल्याने भांडणाचा भडका होण्याचे अनेक प्रकार घडले. त्याचे पर्यवसान थेट गाड्या थांबवून वाहतूक सेवा खंडित करण्याचा कर्मचार्यांचा निर्णय वाहतूक सेवा विस्कळीत होण्यावर झाला.
त्याचबरोबर घाटात ठिकठिकाणी एसटीच्या गाड्या बंद पडल्याने पायपीट करण्याची वेळ भाविकांवर आलेली होती. तात्पुरत्या डागडुजी केलेल्या बसेसही गडावर पाठविल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली होती.