कन्नड; पुढारी वृत्तसेवा : हिवरखेडा रोड लगत असलेल्या विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या पाठीमागील तळयात बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. ७) घडली. अर्जुन सोमनाथ गायके असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो हतनूर येथील रहिवासी असून सात महिन्यांपासून डोणगाव येथील वारकरी शिक्षण संस्थेत सांप्रदायिक शिक्षण घेत होता.
दि.५ रोजी अर्जुन हा मोठा भाऊ करण गायके याच्याकडून तीनशे रुपये घेऊन आश्रमात जातो म्हणून निघून गेला. मात्र गावातील मित्रांसोबत शहरानजीक हिवरखेडा रस्त्यावर असणाऱ्या तळ्यात अंघोळीसाठी गेला. त्याचवेळी अर्जुन आंघोळ करत असताना पाण्यात बुडत असल्याचे दिसताच सोबत असलेल्या मित्रांनी पळ काढला. त्याच्या मित्रांनी सदर घटना कुणालाही सांगितली नाही. आपला मुलगा आश्रमात गेला की नाही हे पाहण्यासाठी वडिलांनी दि. ६ रोजी आश्रमात संपर्क केला. त्यावेळी अर्जुन हा बेपत्ता असल्याचे त्याच्या वडिलांना कळाले.
अर्जुनच्या पालकांनी व नातेवाईकांनी शोध घेतला परंतु तो न सापडल्याने शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश जाधव, बीट जमादार आर. बी. भुसारे, शरद चौधरी यांनी तपास कार्य सुरु केले.
हतनूरला जावून त्याच्या मित्रांना विश्वासात घेतल्याने सोबतच्या एका मित्राने घडलेला संपूर्ण वृत्तांत सांगितला व त्यानंतर घटनास्थळी मुलाचे कपडे, चप्पल, बॅग आढळून आली. त्यानंतर अर्जुनचे प्रेत पाण्यातून बाहेर काढण्यात आले. प्रेताचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास बीट जमादार आर. बी. भुसारे व शरद चौधरी करत आहे.