माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांचा हल्ला | पुढारी

माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांचा हल्ला

अमरावती : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस नेते तथा चांदूर मतदार संघातील माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहार कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला. रॉकेल टाकून प्रा. जगताप यांचे घर पेटविण्याचा प्रयत्न देखील झाला. ही घटना गुरुवारी (७ आक्टोंबर) घडली. महा विकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हा हल्ला करविल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. हल्ला करून पळण्याच्या प्रयत्नात असतांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी काँग्रेसने पोलीस ठाण्यावर धाव घेत तक्रार दाखल केली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लागलेल्या निकालाचे पडसाद जिल्ह्यात उमटायला लागले आहे. जिल्हा बँकेच्या हायप्रोफाईल निवडणुकी नंतर जिल्ह्यात त्याचा प्रभाव पाहायला मिळत आहे. विजयानंतर वीरेंद्र जगताप यांनी ढोल वाजवत बच्चू कडू यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचा विडिओ व्हायरल करत प्रहार कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात आंदोलन केले होते. त्याचाच भाग म्हणून आज सकाळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या निवासस्थानी 10 ते 12 प्रहार च्या कार्यकर्त्यांनी दोन गाड्यांमध्ये येऊन भ्याड हल्ला केला. जगताप यांचा पुतळा जाळत घरावर दगडफेक केल्याची माहिती आहे. नारे ऐकून प्रा. जगताप बाहेर आले असता हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. परंतु अमरावती मार्गावर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी या हल्लेखोरांना पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती उपस्थितांनी दिली. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करीत सर्व आरोपींना अटक केली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पोलीस स्टेशन मध्ये धाव

घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पोहचताच काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती गणेश आरेकर, नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे, पंचायत समिती सदस्य अमोल होले, युवक काँग्रेस सरचिटणीस परीक्षित जगताप, शहराध्यक्षा निवास सूर्यवंशी, नवनियुक्त संचालक श्रीकांत गावंडे, माजी जि. सदस्य मोहन शिंघवी, नांदगाव खंडेश्वर चे माजी नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, माजी जि प सदस्य निशिकांत जाधव, सचिन रिठे, मुमताज कुरेशी संकेत देशमुख अमोल मोरे शिवाजी चव्हाण बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी फोन वरून घटनेची माहिती घेतली असल्याचे समजते.

बच्चू कडू यांना पराभव पचविता आला नाही

स्वतःला शेतकरी नेते म्हणणारे, राज्यमंत्री बच्चू कडू यांना जिल्हा बँकेत पॅनल चा झालेला दारुण पराभव पचविता आला नाही. आईवर शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप करीत कार्यकर्त्यांचे माथे पेटविण्याचे काम ते करीत आहे. आज त्यांच्या गुंडांनी केलेला भ्याड हल्ला म्हणजे महाराष्ट्राला बिहार करण्याचा प्रकार असल्याचे मत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले

हल्लेखोरांना अटक करण्याची कारवाई सुरू

आज शहरात दोन गाड्या भरून आलेल्या 10 ते 12 हल्लेखोरांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला करीत दगडफेक केली. त्यांचा पुतळा जाळला तुम्हाला बघून घेऊ, मारू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. त्यावरून सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेउन प्रा. जगताप यांच्या तक्रारीवरून अटकेची कारवाई सुरू आहे. शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
-शशिकांत सातव, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक

Back to top button