सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
'स्मार्ट सिटी' असलेल्या सोलापुरात भाजपच्या निष्क्रियतेमुळे मूलभूत सुविधांची बोंब आहे. पाच दिवसांआड पाणी तसेच दोन देशमुखांच्या वादामुळे शहरवासीयांना जुलमी कारभाराला सामोरे जावे लागत आहे. तेव्हा आता भाजपच्या ताब्यातून ही महापालिका आपण ताब्यात घेऊ, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'परिवार संवाद' कार्यक्रमात करण्यात आला.
मंगळवारी हेरिटेज येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी प्रदेशच्या विविध सेलप्रमुखांची भाषणे झाली. प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे यावेळी म्हणाले की, सोलापूर महापालिका कारभाराबाबत भाजपमध्ये एकखांबी नेतृत्व नाही. आमदार असलेल्या दोन देशमुखांमुळे महापालिकेच्या कारभारावर परिणाम झाला आहे. सत्ताधार्यांना बजेट वेळेवर करता आले नाही. सोलापूर ही 'स्मार्ट सिटी' करण्यापेक्षा भाजपचे नेतेच ओव्हर स्मार्ट झाले आहेत. कोरोना आपत्ती निवारणकामी महापालिकेतील सत्ताधार्यांना अपयश आले. याउलट पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे कोरोनासंदर्भातील काम चांगले होते. भाजपच्या जुलमी कारभाराला जनता वैतागली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला ही महापालिका ताब्यात घ्यावयाची आहे. राष्ट्रवादीचा महापौर करुन पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेट द्यायची आहे.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश युवती विभागाच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्यासह अनेकांची यावेळी भाषणे झाली. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती खरी, पण अनेक जबाबदार पदाधिकारी उपस्थित नसल्याचे समजताच जयंत पाटील हे संतप्त झाले. त्यांनी पदाधिकार्यांशी प्रश्नोत्तर रुपाने संवाद साधत प्रश्नांचा भडीमार केला. यातून पक्षाची संघटनात्मक बांधणीचा अंदाज त्यांना आला. पक्षाची यासंदर्भातील कामगिरी निराशाजनक असल्याचे पाहून त्यांनी सर्वांनाच खडे बोल सुनावले.
यावेळी पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी पक्षाविषयी तपशीलवार माहिती प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमोर सादर केली. आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकूण 38 प्रभाग राहणार असून याकरिता पक्षाचे 233 कार्यकर्ते इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी नवीन सभासद नोंदणीबाबत थेट शहराध्यक्ष भारत जाधव यांना किती पुस्तके संपली, किती पैसे जमा झाले, असा प्रश्न केला. यावर जाधव यांना व्यवस्थित माहिती देता आली नाही.
हेही वाचलत का ?