गोवा : ‘महालक्ष्मीत’ मुख्यमंत्री म्हणून कोण प्रवेश करणार?

गोवा : ‘महालक्ष्मीत’ मुख्यमंत्री म्हणून कोण प्रवेश करणार?
Published on
Updated on

पणजी ; पुढारी वृत्तसेवा  गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या १० मार्चला लागणार आहे. ४० जागांसाठी झालेल्या या मतदान प्रक्रियेत ३०१ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे निकालानंतर आल्तिनोच्या 'महालक्ष्मी' या सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्री म्हणून कोण प्रवेश करणार? याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.

भाजपने ही निवडणूक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुढे रेटली. त्यामुळे भाजपकडून सध्याच्या घडीला डॉ. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील असे चित्र आहे. परंतु भाजपमध्ये काँग्रेसमधून आलेल्या महत्त्वकांक्षी नेत्यांनीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपला घोडा दामटला आहे. अप्रत्यक्षरीत्या या पदासाठी आपण कसे योग्य आहोत हे या ना त्या कारणाने जनतेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग या नेत्यांनी पद्धतशीरपणे चोखाळलेला दिसतो.

बहुमतावर खेळ अवलंबून… 

भाजपमधून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि वीज मंत्री निलेश काब्राल अशी मंत्रिमंडळातील दिग्गज नेत्यांची यादी पुढे सरकली आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्री म्हणून ऐनवेळी कोणाचेही नाव पुढे येऊ शकते असे सूतोवाच यापूर्वी पक्षातील नेत्यांनी जाहीरपणे दिले आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास डॉ. सावंत हे पुन्हा महालक्ष्मीतच राहतील. पक्ष्याला बहुमत न मिळाल्यास गोळा बेरजेच्या राजकारणात गुदिन्हो, राणे आणि काब्राल यांना इतर आमदारांची जुळवाजुळव करावी लागू शकते. त्यातूनच त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल असे पक्षातीलच धुरीणांना वाटते.

ढवळीकरांची मनोकामना… 

मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोण योग्य आहे याविषयी राणे आणि काब्राल यांचे नाव सांगत भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी असेल, असेच सूतोवाच दिले असावेत असे वाटते. परंतु सुदिन ढवळीकर यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा यापूर्वीही उफाळून आली होती. जर मगोप – तृणमूल काँग्रेस ही युती किंगमेकर ठरणार आहे तर ढवळीकर मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत काँग्रेसपुढे प्रस्ताव देऊ शकते. हा जर तरचा प्रश्न आहे. त्यासाठी आणखी १४ दिवस वाट पहावी लागेल.

काँग्रेसमध्ये अनेकजण इच्छूक… 

प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते यावेळी आम्ही स्पष्ट बहुमताने सत्तेत येणार, असे छातीठोकपणे जाहीररित्या बोलत आहेत.
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचे नाव आघाडीवर असल्याचे सध्या दिसते. परंतु काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे आणि भाजपसोडून काँग्रेसमध्ये आलेले, तसेच बार्देश तालुक्यात काँग्रेसचा झेंडा रोवण्यास निघालेले मायकल लोबो हेसुद्धा दावेदार असू शकतात. त्याच बरोबर काँग्रेसला जर स्पष्ट बहुमत मिळाल्यास व राज्यात पक्षाला उर्जितावस्था दिल्यामुळे राहुल गांधी यांची मर्जी कदाचित प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपद चालून येऊ शकते.

चोडणकर शिक्षक आणि अभ्यासू नेते असल्याने आणि पक्षाची पुनर्बांधणी करण्यात यशस्वी ठरल्याने राहुल गांधी त्यांच्या नावाचा विचार करू शकतात. कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावे यासाठी फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांची गरज भासणार आहे, त्यादृष्टीनेच काँग्रेस – फॉरवर्ड युती आकारास आली आहे. कामत मुख्यमंत्री झाल्यास सरदेसाई यांच्याकडे चांगले खाते किंवा उपमुख्यमंत्रीपदसुद्धा जाऊ शकते हे काँग्रेस मधील नेतेच सांगतात.

काँग्रेसला जर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जुळवाजुळव करावी लागलीच, तर त्यासाठी लोबो यांच्यावर इतर आमदारांना वळविण्याची जबाबदारी पक्ष टाकू शकतो. लोबो यांच्यात अशी जबाबदारी पेलण्याची क्षमता आहे. त्यामुळे लोबो हे अशा जुळवाजुळवीच्या सत्तेत मुख्यमंत्रिपदासाठी दावाही सांगू शकतात. हा सर्व शक्य अशक्यांच्या बाबी आहेत. त्यामुळे आल्तिनोवरील महालक्ष्मीवर ताबा कोण मिळवणार याचा खेळ १० मार्चच्या दुपारपासून सुरु होणार, हे निश्चित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news