हंजगी : अक्‍कलकोट, मैंदर्गी, दुधनीत राजकीय हालचालींना वेग ; नगरपरिषद निवडणुक | पुढारी

हंजगी : अक्‍कलकोट, मैंदर्गी, दुधनीत राजकीय हालचालींना वेग ; नगरपरिषद निवडणुक

हंजगी: पुढारी वृत्तसेवा
सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केल्याने आता अक्कलकोट तालुक्यातील मुदत संपलेल्या अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी या तीन नगरपालिकांत आता जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. नगरपरिषद निवडणुकांसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावभेटी दौर्‍यावर भर दिला आहे.
2 मार्च ते 5 एप्रिलदरम्यान प्रारुप प्रभाग रचना तयार करणे व त्यावर हरकती, सूचना मागविण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी या तीन नगरपरिषदांची मुदत 29 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे. तालुक्यातील या तीन नगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी आता जोरदार सुरू झाली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रारुप रचनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी 2 मार्च ही मुदत आहे. प्रस्तावास मान्यता देण्यासाठी 7 मार्च ही मुदत आहे. प्रारुप प्रभाग रचनेचे नकाशे व माहिती प्रसिद्ध करण्यासाठी 10 मार्च ही मुदत असून 10 ते 17 मार्चपर्यंत हरकती, सूचना मागविण्याचा कालावधी आहे. या हरकती व सूचनांवर 22 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. 25 मार्च रोजी संपूर्ण अहवाल निवडणूक आयोगाला पाठविणे आवश्यक आहे. 1 एप्रिल रोजी राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देतील, तर 5 एप्रिल रोजी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. आता तालुक्यातील नगरपरिषद निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने सर्वच पक्षांचे नेते व इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. यंदा अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी नगरपरिषद निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार असल्याचे बोलले जात आहे.

अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी या तीन नगरपरिषदांची मुदत 29 डिसेंबर 2021 रोजीच संपल्याने या तीन नगरपरिषद निवडणुका कधी होणार, असा प्रश्‍न सर्वच पक्षांच्या नेत्यांना पडला होता.आता निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने सर्वच नेते आता सतर्क होऊन गाठीभेटींना जोर देत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button