मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने अटकेची कारवाई केल्याच्या निषेधार्थ मालेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली. 'नहीं चलेगी इडी की दादागिरी', 'नवाब मलिक हम तुम्हारे साथ' आणि 'मोदी सरकार अत्याचार बंद करा' अशा घोषणा देण्यात आल्या.
भाजप दबावतंत्र अवलंबत आहे. मंत्री मलिक हे सातत्याने भाजपविरोधात आवाज उठवत असल्यानेच त्यांना लक्ष करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत हिंदूंची मते खेचण्यासाठीच मुस्लीम नेत्यांना अटक केली जात असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी यावेळी केला.
शासकीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. केंद्राचा हा प्रयत्न काही काळासाठी तरी यशस्वी होईल, मात्र याचे दूरगामी परिणाम भाजपला भोगावे लागतील. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नवाब यांच्या समर्थनार्थ लढा उभारण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.
याप्रसंगी 'मामको'चे अध्यक्ष राजेंद्र भोसले, स्थायी समितीचे सभापती जफर अहमद, माजी नगरसेवक शकील जानीबेग, एजाज उमर, सतीश शिंदे, कल्पेश गायकवाड, राहुल पवार, रियाज अली आदी कार्यकर्ते उपस्थित होते.