

राधानगरी ; पुढारी वृत्तसेवा : लग्नाचा मुहुर्त आज (दि.१८) दुपारी असताना वेळात वेळ काढून नवरदेवाने पाचल दिवाळवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. अक्षय महादेव तळेकर असे नवरदेवाचे नाव आहे.
राजापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज (दि.१८) सकाळी सुरवात झाली. लग्नाचा मुहर्त दुपारी असल्याने त्याआधीच पहिले कर्तंव्य मतदानाचे म्हणत अक्षय सकाळी साडेआठच्या सुमारास मतदान केंद्रावर पोहचला. डोक्यावर मुंडवळ्या बांधून वराच्या वेषात त्याने मतदान केंद्रात जावून आपल्या मताचा हक्क बजावला. विवाह सोहळ्याची लगबग सुरू असताना देखील मतदानाला महत्त्व दिल्याने अक्षय तळेकर याचे परिसरात कौतुक होत आहे.