नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा

नाशिक : नेहरू उ्दयानाभोवती असलेला हातगाड्या विक्रेत्यांचा विळखा. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : नेहरू उ्दयानाभोवती असलेला हातगाड्या विक्रेत्यांचा विळखा. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात, शालिमार परिसरात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पंडित नेहरू उद्यानाची निर्मिती केली आहे. मात्र, उद्यानाला चायनीजसह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांचा विळखा पडला आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासह संरक्षण भिंतीलगत राजरोसपणे टेबल-खुर्च्या मांडून अतिक्रमण करत व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे उद्यानात येणार्‍या आबालवृद्धांना अडचणींचा सामना करावा लागतो.

उद्यानाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीआड अतिक्रमणधारकांनी बस्तान बसविले. सायंकाळी 4 वाजेनंतर हातगाड्यांची गर्दी होत असते. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील दादासाहेब गायकवाड पुतळा, रमाई वसतिगृह, सारडा कन्या विद्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत विक्रेते दररोज ठाण मांडतात. तर खवय्येही रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडी आमंत्रण मिळत असते.थेट रस्त्यावरच रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून दुकाने थाटले जातात. रस्त्याची जागा दिवसा मिसळपाव विक्रेत्यांच्या तर सायंकाळी चायनीज, भेळपुरी, अंडाभुर्जी, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या घेतात. त्यामुळे नेहरू उद्यानाच्या रस्त्याला 'फूड स्ट्रीट' म्हणून नवीन ओळख मिळत आहे.

राजकीय वरदहस्त, अधिकारी हतबल
नेहरू उद्यानालगतच्या अतिक्रमणधारकांना राजकीय वरदहस्त लाभला आहे. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्यानेच अधिकारी-कर्मचारी हतबल ठरतात. त्यामुळे अतिक्रमणधारकांची हिंमत अधिकच वाढली असून, परिणामी दिवसागणिक हातगाड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. संबंधित राजकीय पुढार्‍यांकडून सर्रास हप्ते वसुली केली जात आहे. त्या मोबदल्यात अतिक्रमणधारकांना संरक्षण पुरविले जाते.

नियमित वाहतूक कोंडी
सार्वजनिक वाचनालय, चार ते पाच बँका, इतर खासगी कार्यालये, दोन शाळा, एक मुलींचे वसतिगृह तसेच मुख्य बाजारपेठेला जोडणारा रस्ता यामुळे नेहरू उद्यान परिसरात नेहमीच वाहनांसह पादचार्‍यांची वर्दळ असते. विशेषत: शाळा सुटण्याच्या वेळी तसेच भरण्याच्या वेळी मोठी गर्दी होत असते. रस्त्यावरच हातगाड्यांचे अतिक्रमण झाल्याने नियमित वाहतूक कोंडी होत असते. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने पायी चालणेही नागरिकांना मुश्किल होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news