विरोधकांच्या घुसखोर प्रवृत्तीचा जनता करेक्ट बंदोबस्त करेल : समरजितसिंह घाटगे | पुढारी

विरोधकांच्या घुसखोर प्रवृत्तीचा जनता करेक्ट बंदोबस्त करेल : समरजितसिंह घाटगे

म्हाकवे; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन योजनेतील कामांचे उद्घाटन आम्ही कार्यक्रमाच्या पत्रिका काढून जाहीरपणे करत आहोत. विरोधक मात्र आम्ही जाहीर केलेल्या तारखेच्या आदल्या दिवशी येऊन सदर योजनांचे श्रेय घेण्यासाठी घाईघाईने उद्घाटन करत आहेत. त्यामुळे त्यांना घुसखोरच म्हणावे लागेल, विरोधकांच्या घुसखोर प्रवृत्तीचा जनता करेक्ट बंदोबस्त करेल, असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता लगावला.

म्हाकवे (ता. कागल) येथे जलजीवन मिशन योजनेतून ४ कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या पाणी योजनेचा शुभारंभ, बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व गुणवंतांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील होते.

यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की, केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून कागलमध्ये निधी मिळालेल्या योजनांचे उद्घाटन विरोधकांकडून होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो जाहिरातीत वापरत नाहीत. केंद्राचा निधी घेताना कमीपणा वाटत नाही. मग फोटो वापरताना कमीपणा वाटणाऱ्या विरोधकांचा हा कृतघ्नपणा नव्हे का? असा सवाल घाटगे यांनी  केला.

आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्री असताना याच गावच्या चौकातून येथील वारकऱ्यांसाठी पंढरपूरमध्ये मठ बांधण्यासाठी ५० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. या निधीचे काय झाले. तसेच ग्रामपंचायत इमारतीसाठी १ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. हा निधी कुठे आहे? जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी निधी द्यावा. त्यांनी वारकरी व ग्रामस्थांच्या भावनेशी खेळू नये, असेही ते म्‍हणाले.

उपसरपंच धनंजय पाटील यांनी स्वागत केले. महावीर पाटील, रविंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, पी. डी. चौगुले, ए. डी. पाटील, अजित पाटील, संदीप पाटील, संदीप कांबळे, प्रताप पाटील, दत्ता खराडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button