नाशिक: पारंपरिकतेने साजरी झाली आषाढी एकादशी
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
आषाढी एकादशीनिमित्त कामटवाडे येथील सरस्वती विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागामध्ये कार्यक्रम मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका शिल्पा गांगुर्डे यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करून आरती केली. त्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले. विदयालयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभुषेत हजेरी लावली. तसेच ढोलपथकाच्या गजरात अभंग, भजन गात दिंडी काढण्यात आली. मुख्याध्यापिका यांनी मुलांना आषाढी एकादशीच्या दिवसाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध भजने, अभंग आणि नृत्य सादर केले. शिक्षकांनीही भजन स्पर्धेत सहभाग घेतला. विठ्ठलाचे भजन गायन करण्यासाठी भजनी मंडळींना शाळेत बोलवण्यात आले होते. त्यामुळे शाळा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. यावेळी परिसरातील पालकांना तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी देखील उपस्थिती दर्शवली. स्मिता बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. पवार यांनी आभार मानले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

