IND vs AUS : फिरकीविरुद्ध आक्रमक डावपेच : ट्रॅव्हिस हेड

IND vs AUS : फिरकीविरुद्ध आक्रमक डावपेच : ट्रॅव्हिस हेड
Published on
Updated on

इंदूर, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने भारतीय फिरकीविरुद्ध आक्रमक डावपेच वापरणार असल्याचे संकेत दिले आहेत. दिल्ली कसोटीत (IND vs AUS) हा एकमेव ऑस्ट्रेलियन फलंदाज फिरकीला आत्मविश्वासाने सामोरा गेला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसर्‍या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जवळपास निम्मा संघ हा नवीन असणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळलेल्या अनेक खेळाडूंनी दुखापत आणि इतर वैयक्तिक कारणांमुळे मायदेश गाठला आहे. यामुळे आता तिसर्‍या सामन्यात कांगारूंचा निम्मा संघ नवा असणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने भारतीय फिरकीविरुद्ध आक्रमक डावपेच वापरणार असल्याचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन कसोटी सामन्यांत अडीच दिवसांत गाशा गुंडाळावा लागला होता. यावेळी कांगारूंना भारतीय फिरकीचा सामना करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले.

हेडला नागपूर कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. याबाबत हेड म्हणाला की, या गोष्टीची मला अपेक्षा नव्हती. मी याबाबत खूप चर्चा केली. कोचिंग स्टाफ आणि निवड समितीचा मी आदर करतो. माझे आणि त्यांचे नाते खूप चांगले आहे. सामन्यानंतर मी स्वतःला सांगितले की, मी अजूनही मला जे आवडते ते मी करत आहे. हा फक्त एक आठवडा माझ्या मनासारखा गेलेला नाही.

हेडला दुसर्‍या कसोटीत संधी मिळाली. त्याने डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत डावाची सुरुवात केली. त्याने भारतीय गोलंदाजांवर दबावदेखील बनवला. दुसर्‍या दिवशी त्याने चांगला किल्ला लढवला. मात्र, तिसर्‍या दिवशी तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाने 52 धावांत 9 विकेटस् गमावल्या. दिल्ली कसोटीत हेडने दुसर्‍या डावात 43 धावा केल्या. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे हेडने सांगितले.

ऑस्ट्रेलिया चार सामन्यांच्या मालिकेत सध्या 0-2 ने पिछाडीवर आहे. हेडने मान्य केले की, मालिकेत पुनरागमन करण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. (IND vs AUS)

आमचा संघ खूप मजबूत आणि एकजूट आहे. सामन्यादरम्यान अशी परिस्थिती असेल की, आम्ही चांगल्या स्थितीत नसू; मात्र आम्हाला याचा सामना केला पाहिजे. तुम्हाला हवी तशी परिस्थिती मिळणार नाही. येणारे दोन आठवडे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक असणार आहेत. आम्हाला लय पुन्हा कशी प्राप्त करायची, हे पाहायला हवे. – ट्रॅव्हिस हेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news